– कराटेच्या कुमिते आणि काता प्रकारात शानदार कामगिरी; १२ वर्षीय अमायाच्या यशाने नागपूरच्या क्रीडा क्षेत्राचा गौरव
The Exposer
नागपूर : उत्तराखंडमधील रिशिकेश येथे आयोजित Second All India Traditional Shotokan Sports Karate Championship 2026 मध्ये नागपूरच्या अवघ्या १२ वर्षीय अमाया सुमेध थुल हिने आपल्या दमदार कामगिरीची छाप उमटवत कुमिते आणि काता या दोन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकावले. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत दोन सुवर्णपदकांची कमाई करून अमायाने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
अमाया नागपूर येथील सांदिपनी शाळेत शिक्षण घेत असून, वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षापासून कराटेचे प्रशिक्षण घेत आहे. गेल्या सात वर्षांपासून सुरू असलेल्या सातत्यपूर्ण सरावाला कठोर मेहनत, शिस्त आणि आत्मविश्वासाची जोड देत तिने राष्ट्रीय स्तरावर हे उल्लेखनीय यश संपादन केले.
‘ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करायचेय!’
अमायाच्या डोळ्यांसमोर आता केवळ पदकांचे लक्ष्य नसून ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे मोठे स्वप्न आहे. हे स्वप्न साकार करण्यासाठी ती नियमितपणे कठोर सराव करत असून, आगामी काळात आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करण्याचा तिचा निर्धार आहे.
अमायाच्या या यशामागे विदर्भ कराटे असोसिएशनचे अध्यक्ष तथा कोच विजय गिचारे यांचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण महत्त्वाचे ठरले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अमाया सातत्याने आपल्या खेळात सुधारणा करत आहे.
दोन सुवर्णपदके गुरु आणि आई-वडिलांना समर्पित
रिशिकेशमध्ये मिळवलेली दोन्ही सुवर्णपदके अमायाने आपले गुरु व कोच विजय गिचारे तसेच आई-वडिलांना समर्पित केली आहेत. आपल्या यशात शाळेतील शिक्षकांचेही मोठे योगदान असल्याचे सांगत तिने त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतून मिळालेले शिक्षण, संस्कार आणि प्रोत्साहन यामुळे स्पर्धेत आत्मविश्वासाने सामोरे जाता आले, अशी भावना अमायाने व्यक्त केली.
सह पोलीस आयुक्तांकडून कौतुकाची थाप
अमायाच्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत नागपूर शहराचे सह पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी तिचे स्वागत करून अभिनंदन केले. भविष्यातील क्रीडा कारकिर्दीसाठी शुभेच्छा देत त्यांनी अमायाला ऑलिम्पिकचे स्वप्न साकार करण्यासाठी सातत्याने मेहनत करण्याचे प्रोत्साहन दिले.
Author: संतोष तायडे
संपादक















