काळविटाचे शिंग, हरणाचे शिंग अन् वाघाचा दात! बनावट नोटांच्या टोळीचा उमरेडमध्ये पर्दाफाश

– वन्यजीव अवयवांसदृश वस्तू, अफूसदृश अमली पदार्थ, बनावट नोटा व नोटा तयार करण्याचे साहित्य जप्त; चौघे जेरबंद, ७.९० लाखांचा मुद्देमाल ताब्यात

The Exposer
उमरेड : कमी रक्कम घेऊन त्याच्या बदल्यात जास्त किमतीच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा उमरेड पोलिसांनी पर्दाफाश केला. या कारवाईत काळविटाच्या शिंगासारखे एक शिंग, हरणाच्या शिंगासारखे एक शिंग आणि वाघाच्या दातासारखी वस्तू, तसेच अफूसदृश अमली पदार्थ, बनावट नोटा आणि नोटा तयार करण्याचे साहित्य आढळून आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, ७ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोहार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि उपविभागीय पोलीस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक धनाजी जळक यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.

२६ ऑगस्ट २०२६ रोजी उमरेड शहरातील घटाळी रोड परिसरात काही इसम बनावट नोटा बाळगून त्यांची विक्री करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून मारुती स्विफ्ट (एचआर-०६-एई-६५४९) अडवली. वाहनात कुलदीप कश्यप, मोहित नरेश कश्यप, गौरव राधेश्याम कश्यप आणि एका महिलेसह चौघे आढळले.

झडतीमध्ये १०० रुपयांच्या बनावट नोटांचे सहा बंडल म्हणजे ६० हजार रुपये, तसेच २० रुपयांच्या ११ नोटा मिळाल्या. याशिवाय कागद, काच, मशीन/लॉकर, केमिकलच्या बाटल्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

वाहनाच्या तपासणीत वन्यजीवांच्या अवयवांसदृश वस्तू आढळल्या. तसेच ४.३४ ग्रॅम वजनाचा काळ्या-चॉकलेटी रंगाचा अफूसदृश पदार्थ, ज्याची किंमत २१ हजार ७०० रुपये असल्याचे नमूद आहे, तोही जप्त करण्यात आला.

चौकशीत आरोपी कमी रक्कम घेऊन त्याच्या बदल्यात जास्त किमतीच्या बनावट नोटा देण्याचे आमिष दाखवत असल्याचे समोर आले. नागरिकांचा विश्वास संपादन करण्यासाठी विविध साहित्य दाखवून पैसे घेतल्यानंतर फसवणूक केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

या प्रकरणात अक्षय वसंतराव पाटील याचाही सहभाग असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील कलम ३१८(४), ३(४) तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम आणि एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. वन्यजीव अवयवांसदृश वस्तू नेमक्या कुठून आल्या आणि या व्यवहारामागे आणखी कोणाचे जाळे आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More