– बेसा जयंती नगरी-५ समोरील रस्त्यावर वाहतूक कोंडीचा कहर; सर्व्हिस रोडवरही कथित पार्किंग स्टॅन्ड
– ग्राहकांकडून शुल्कवसुलीचा आरोप; पोलिस, वाहतूक विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांचे सवाल
The Exposer
नागपूर : मॉलच्या इमारतीखाली ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची जागा उपलब्ध असतानाही बाहेरील सार्वजनिक रस्ता आणि सर्व्हिस रोडवर वाहने उभी करून त्यातून कथितपणे पार्किंग शुल्क वसूल केले जात असल्याच्या आरोपाने बेसा-पिपला नगरपंचायत हद्दीतील जयंती नगरी-५ परिसरातील पार्किंग व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मॉलची अधिकृत पार्किंग नेमकी कुणासाठी आणि सार्वजनिक रस्ता कुणाच्या वसुलीसाठी, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

मॉलमध्ये येणाऱ्या ग्राहकांसाठी वाहनतळाची व्यवस्था मंजूर बांधकाम आराखडा आणि स्थानिक नियमांनुसार करण्यात आलेली असते. त्यामुळे संबंधित मॉलच्या इमारतीखालील पार्किंग प्रत्यक्षात ग्राहकांसाठी खुली आहे की नाही, तिचा वापर कोणत्या अटींवर केला जातो आणि पार्किंग शुल्क आकारणीला अधिकृत मंजुरी आहे का, याची तपासणी होणे आवश्यक आहे.
मॉलची पार्किंग असूनही रस्त्यावर वाहने का?
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, मॉलमध्ये वाहनतळाची जागा उपलब्ध असतानाही ग्राहकांची वाहने बाहेरील रस्त्यावर आणि सर्व्हिस रोडवर उभी केली जात असल्याचे चित्र आहे. या ठिकाणी वाहनांची गर्दी वाढत असून, त्यातून वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन वारंवार कोंडी होत असल्याचा आरोप आहे. याहून गंभीर बाब म्हणजे, सार्वजनिक रस्त्यावर उभ्या केलेल्या वाहनांकडून पार्किंगच्या नावाखाली पैसे घेतले जात असल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ही पार्किंग व्यवस्था अधिकृत आहे का, याबाबत प्रशासनाने स्पष्टता आणण्याची मागणी होत आहे.
सार्वजनिक रस्ता की खासगी पार्किंग स्टॅन्ड?

जयंती नगरी-५ समोरील मुख्य मार्ग आणि सर्व्हिस रोडवर पार्किंगचा स्टॅन्ड चालविण्यास परवानगी कोणी दिली, हा आता मुख्य प्रश्न ठरला आहे. जर संबंधित जागा सार्वजनिक वापरासाठी असतील, तर तेथे पार्किंग व्यवस्था उभारण्याचा आणि वाहनधारकांकडून शुल्क वसूल करण्याचा अधिकार कुणाला देण्यात आला, याची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. पार्किंगसाठी अधिकृत परवानगी असल्यास तिची कागदपत्रे, अटी आणि शुल्कवसुलीचा अधिकार प्रशासनाने स्पष्ट करावा. परवानगी नसल्यास सार्वजनिक रस्त्याचा असा वापर सुरूच कसा राहिला, याचीही जबाबदारी निश्चित करण्याची गरज आहे.
‘मोफत पार्किंग’च्या दाव्याचीही पडताळणी गरजेची
मॉलमधील पार्किंगबाबत ‘ग्राहकांना मोफत पार्किंग देणे बंधनकारक’ असल्याचे दावे केले जात असले, तरी प्रत्यक्षात संबंधित मॉलच्या मंजूर आराखड्यातील अटी, स्थानिक विकास नियम आणि लागू पार्किंग धोरण काय सांगते, हे तपासणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे प्रशासनाने संबंधित मॉलची मंजूर बांधकाम कागदपत्रे, पार्किंगची क्षमता, वाहनतळ वापराच्या अटी आणि शुल्क आकारणीसंबंधीची अधिकृत तरतूद तपासून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी आहे.
पोलिस आणि वाहतूक विभागाच्या कारवाईकडे लक्ष
सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहून वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास संबंधित पोलिस आणि वाहतूक विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, हा प्रकार दीर्घकाळापासून सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप असूनही ठोस कारवाई होत नसल्याने पोलिस आणि वाहतूक विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
त्यामुळे वाहतूक कोंडी होत असताना कारवाई का होत नाही? सार्वजनिक रस्त्यावर पार्किंगच्या नावाखाली शुल्क घेतले जात असल्याच्या तक्रारींची चौकशी का केली जात नाही? या प्रश्नांची उत्तरे प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
नगरपंचायत प्रशासनाची जबाबदारीही महत्त्वाची
जयंती नगरी-५ परिसर बेसा-पिपला नगरपंचायत हद्दीत येत असल्याने सार्वजनिक रस्त्याचा वापर, वाहतुकीतील अडथळे आणि मॉलच्या पार्किंग व्यवस्थेबाबत नगरपंचायत प्रशासनानेही भूमिका स्पष्ट करणे गरजेचे आहे. नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असेल, तर केवळ पाहणीपुरते न थांबता संबंधित व्यवस्थेची वैधता तपासून आवश्यक ती कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
संयुक्त तपासणीची मागणी
पोलिस प्रशासन, वाहतूक विभाग आणि नगरपंचायत प्रशासनाने संयुक्तपणे जयंती नगरी-५ परिसराची पाहणी करून मॉलच्या पार्किंग व्यवस्थेची वस्तुस्थिती तपासावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. मॉलखाली बेसमेंटमध्ये पार्किंग ग्राहकांसाठी प्रत्यक्षात उपलब्ध आहे का, बाहेरील सर्व्हिस रोडवरील पार्किंगला अधिकृत परवानगी आहे का, वाहनधारकांकडून शुल्क वसूल करण्याचा अधिकार कुणाला आहे आणि सार्वजनिक रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण होत असल्यास त्यावर कोणती कारवाई करण्यात आली, याची स्पष्ट माहिती प्रशासनाने द्यावी.
शहर पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, बेसा-पिपला नगरपंचायतीचे मुख्याधिकारी भारत नंदनवार, नगराध्यक्ष कीर्ती बडोले तसेच सर्वपक्षीय नगरसेवकांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी करावी आणि नियमबाह्य पार्किंग आढळल्यास कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















