अपघात झाला तर जबाबदार कोण? पोलिस आयुक्तांनी ओसीन–इन्सारा रस्त्याची तातडीने पाहणी करावी!

– अरुंद वळणांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; Road Safety Audit करून धोकादायक स्पॉटचा बंदोबस्त करण्याची नागरिकांची मागणी

The Exposer
नागपूर : घोगली मार्गावरील मंजूर १८ मीटर डीपी रोडच्या कामावरून सुरू असलेला वाद आता थेट विद्यार्थी, पादचारी आणि वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न बनला आहे. ओसीन सुपर सिटी आणि इन्सारा सिटी परिसरातील कथित अरुंद वळणे, अपुरी दृश्यमानता आणि रस्ता रुंदीकरणाबाबतच्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी रस्ता सुरक्षा पथकासह घटनास्थळी पाहणी करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

नागरिकांचा आरोप आहे की, विकास आराखड्यानुसार काही ठिकाणी मंजूर १८ मीटर रस्ता व पावसाळी नाली सरळ न घेता अरुंद वळणदार करण्यात आल्याने समोरून येणाऱ्या वाहनांची दृश्यमानता आणि सुरक्षित क्रॉसिंगबाबत धोका निर्माण होऊ शकतो. भविष्यात या ठिकाणी अपघातप्रवण स्पॉट किंवा वाहतूक कोंडी निर्माण होण्याची शक्यता आहे का, याचे तांत्रिक परीक्षण करण्याची मागणी आहे.

शाळा–कॉलेजजवळ संभाव्य ‘ब्लाइंड स्पॉट’; पोलिसांनी आधीच दखल घ्यावी!

ओसीन सुपर सिटी परिसरात शाळेची संरक्षण भिंत, लगतचे कॉलेज आणि निवासी फ्लॅट्स असल्याने विद्यार्थी व नागरिकांची वर्दळ असते. त्यामुळे या ठिकाणी रस्त्याची रुंदी, वळणाची रचना, दृश्यमानता, फुटपाथ, नाली, स्ट्रीट लाइट, साईनेज आणि आपत्कालीन वाहनांसाठी उपलब्ध जागेचे स्वतंत्र Road Safety Audit करणे आवश्यक असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. “संरक्षण भिंतीपेक्षा विद्यार्थ्यांची सुरक्षा महत्त्वाची,” अशी भूमिका घेत, रस्त्याच्या सुरक्षिततेला बाधा ठरणारे कोणतेही बांधकाम असल्यास त्याबाबत कायदेशीर प्रक्रियेनुसार निर्णय घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

१८ मीटरचा रस्ता प्रत्यक्षात किती?

इन्सारा सिटी परिसरात मंजूर विकास आराखड्यानुसार १८ मीटरचा डीपी रोड असल्याचे सांगितले जात असताना प्रत्यक्ष रस्ता काही भागात अरुंद व वळणदार करण्यात आल्याचा नागरिकांचा आरोप आहे. हा बदल कोणत्या नियमाने व कुणाच्या आदेशाने करण्यात आला, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे मंजूर नकाशातील रस्ता सीमारेषा आणि प्रत्यक्ष रस्त्याची स्थिती यांची संयुक्त तांत्रिक मोजणी करावी. रस्ता अरुंद करण्यास सक्षम प्राधिकरणाची मंजुरी आहे का, त्यामागे तांत्रिक कारण काय आणि सुरक्षिततेच्या निकषांचे पालन झाले आहे का, हे स्पष्ट करावे, अशी मागणी आहे.

लाल मार्किंगनंतरही कारवाई का थांबली?

परिसरातील शाळेच्या संरक्षण भीतीवरील रस्ता रुंदीकरणाचे मार्किंग

रुंदीकरणात बाधित होणाऱ्या प्लॉट, बांधकामे आणि संरक्षण भिंतींवर लाल मार्किंग करण्यात आल्याचे नागरिक सांगतात. मात्र, त्यानंतर काही बाधित भागांवर कारवाई न करता उलट रस्ता व पावसाळी नाली वळविण्यात किंवा अरुंद करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप तथ्यात्मकदृष्ट्या तपासण्यासाठी पूर्वीचे मार्किंग, मंजूर नकाशा, प्रत्यक्ष मोजणी आणि संबंधित नोटिसा यांची पडताळणी करावी. कारवाई न करण्याचा निर्णय झाला असल्यास त्यामागील सक्षम अधिकाऱ्याचा आदेश आणि कारणेही सार्वजनिक करावीत, अशी मागणी आहे. 

जुन्या डांबरी मलब्याचा वापर? स्वतंत्र तपासणीची मागणी

रुंदीकरणाच्या कामात मुरूम, बोल्डर, मेटल व गिट्टीऐवजी जुन्या डांबरी रस्त्याचा मलबा वापरला जात असल्याचा स्थानिक नागरिकांचा आरोप आहे. या आरोपाची सत्यता तपासण्यासाठी कामाच्या ठिकाणाहून नमुने घेऊन अधिकृत प्रयोगशाळेत तपासणी करावी. बेसची जाडी, लेयरिंग, ग्रेडेशन, कॉम्पॅक्शन आणि वापरलेल्या साहित्याची गुणवत्ता मंजूर तांत्रिक कागदपत्रांशी पडताळावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

‘टीडीआरच्या बदल्यात रस्ता’—प्रक्रिया कितपत पारदर्शक

नगरपंचायतीचे मुख्याधिकारी भारत नंदनवार यांनी कंत्राटदाराला टीडीआर देण्यात येत असून त्याच्या बदल्यात कंत्राटदार स्वतःच्या खर्चाने रस्ता रुंदीकरण व सिमेंट रस्त्याचे काम करीत असल्याचे सांगितले आहे. मात्र, या दाव्याची अधिकृत कागदपत्रांद्वारे पडताळणी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. त्यामुळे टीडीआरची प्रक्रिया किती पारदर्शक आहे, यात घोळ तर करण्यात आला नाही. हे तपासण्यासाठी टीडीआरची मंजुरी, त्याच्या अटी, रस्ता विकासाचा मंजूर नकाशा, तांत्रिक मान्यता, कामाचे स्पेसिफिकेशन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांचा तपशील सार्वजनिक करावा, अशी मागणी आहे.

पोलिस आयुक्तांकडे नागरिकांची थेट मागणी

नागरिकांच्या मागणीनुसार पोलिस आयुक्तांनी ओसीन सुपर सिटी व इन्सारा सिटी परिसराची तातडीने प्रत्यक्ष पाहणी करावी. रस्ता सुरक्षा अधिकारी व पथकाकडून Road Safety Audit करून घ्यावे. संभाव्य अपघातप्रवण स्पॉट निश्चित करून त्याचा तातडीने बंदोबस्त करावा. बेसा–पिपळा नगरपंचायतीला आवश्यक सुरक्षा उपाययोजनांचे निर्देश द्यावेत.मंजूर रस्ता आराखडा व प्रत्यक्ष बांधकामातील फरकाची पडताळणी करावी. रस्ता सुरक्षा नियम किंवा लागू कायद्यांचे उल्लंघन झाल्याचे तपासणीत निष्पन्न झाल्यास जबाबदार व्यक्तींची भूमिका निश्चित करून लागू कायद्यानुसार कारवाई करावी.

अपघाताची वाट पाहायची की आधीच धोका दूर करायचा?

“अपघात झाल्यानंतर चौकशी करण्यापेक्षा संभाव्य धोकादायक ठिकाणाची आधीच ओळख करून प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे आवश्यक आहे,” अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे. रस्ता किती मीटर आहे, वळण सुरक्षित आहे का, बाधित क्षेत्रावर कारवाई का झाली नाही, जुन्या मलब्याचा वापर झाला का आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचे परीक्षण झाले आहे का—या प्रश्नांची उत्तरे आता कागदोपत्री आणि तांत्रिक अहवालातूनच मिळणे आवश्यक आहे. या सर्व बाबींची निष्पक्ष चौकशी करून दोष किंवा नियमभंग आढळल्यास संबंधितांवर लागू कायद्यांनुसार योग्य ती कारवाई करावी, अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिस आयुक्ता विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे केली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More