महानगरपालिकेतील कामगार नेते गौतम गेडाम यांचे निधन; आंबेडकरी चळवळीने गमावला निष्ठावान भीमसैनिक

– कर्मचारी-कामगारांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर आवाज उठवणारे नेतृत्व काळाच्या पडद्याआड
– गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार, मोठ्या जनसमुदायाची उपस्थिती

The Exposer
नागपूर : आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांचे निष्ठावान भीमसैनिक आणि नागपूर महानगरपालिकेतील कामगार नेते गौतम मंगलजी गेडाम यांचे निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने आंबेडकरी चळवळीसह नागपूर महानगरपालिकेतील कर्मचारी व कामगार वर्गात शोककळा पसरली आहे.

गौतम गेडाम यांनी नागपूर महानगरपालिकेत कनिष्ठ लिपिक म्हणून प्रदीर्घकाळ सेवा बजावली. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी कर्मचारी व कामगारांच्या प्रश्नांशी असलेली नाळ कायम ठेवली. नॅशनल नागपूर कॉर्पोरेशन एम्प्लॉईज असोसिएशन (इंटक), नागपूरचे संघटन मंत्री म्हणून त्यांनी कामगारांच्या विविध प्रश्नांना वाचा फोडली. तसेच नागपूर महानगरपालिका कर्मचारी सहकारी बँक लि., महाल, नागपूर येथे माजी संचालक म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली.

कर्मचाऱ्यांच्या अडचणी, त्यांच्या हक्कांचे प्रश्न तसेच विविध प्रशासकीय बाबींवर ते सातत्याने आवाज उठवत असत. सहकाऱ्यांच्या सुख-दुःखात धावून जाणे आणि गरजेच्या वेळी मदतीचा हात पुढे करणे, या स्वभावामुळे महानगरपालिकेतील कर्मचारी आणि सहकाऱ्यांमध्ये त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध निर्माण झाले होते.

आंबेडकरी विचारांशी बांधिलकी जपत सामाजिक चळवळीतही ते सक्रिय राहिले. कामगारांचे प्रश्न आणि सामाजिक न्यायाची भूमिका यासाठी त्यांनी सातत्याने योगदान दिले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सहकारी, मित्रपरिवार, कामगार संघटनांचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि हितचिंतकांनी दुःख व्यक्त केले.

शुक्रवारी दुपारी गंगाबाई घाट येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी नातेवाईक, मित्रपरिवार, महानगरपालिकेतील सहकारी, कामगार संघटनांचे पदाधिकारी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि त्यांचा मोठा चाहता वर्ग उपस्थित होता. त्यांच्या आकस्मिक निधनाने एक निष्ठावान भीमसैनिक आणि कर्मचारी-कामगारांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढणारे नेतृत्व गमावल्याची भावना उपस्थितांमध्ये व्यक्त झाली. गौतम गेडाम हे प्लॉट नं. १०, एकमाता को-ऑप. सोसायटी, संकल्प नगर, नागपूर. येथे राहायचे. त्यांच्या पश्चात पत्नी प्रेमा गौतम गेडाम, मुलगा मेहुल गौतम गेडाम आणि मुलगी सेजल गौतम गेडाम असा परिवार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More