– CCTV, FSLपासून वैद्यकीय नोंदींपर्यंत सर्व पुरावे तपासण्याची मागणी; कुटुंबाला न्याय व कायदेशीर मदतीसाठी आवाज बुलंद
The Exposer
नागपूर : गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत १५ सप्टेंबर २०२६ रोजी झालेल्या गंभीर रस्ता अपघातात आदिवासी युवक बबलू कुलमेठे यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत दोन मुले जखमी झाली असून एका ज्येष्ठ नागरिकाची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना ICUमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक आणि वैज्ञानिक पद्धतीने चौकशी करण्यात यावी, या मागणीसाठी मंगळवारी नागपूरच्या संविधान चौकात कँडल मार्च काढण्यात आला.
कँडल मार्चमध्ये नगरसेवक प्रमोद ठाकूर, ॲड. सिद्दीकी, ॲड. तायडे, सतीश पेंदाम, रजत महेशगवळी, राकेश भलावी, मृत बबलू कुलमेठे यांचे भाऊ पंकज कुलमेठे यांच्यासह नागरिक, सामाजिक कार्यकर्ते, अधिवक्ते आणि आदिवासी समाजबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. उपस्थितांनी दिवंगत बबलू कुलमेठे यांना श्रद्धांजली अर्पण केली. तसेच अपघाताची संपूर्ण वस्तुस्थिती तपासातून समोर यावी आणि दोषी अथवा निर्दोष कोण आहे, हे उपलब्ध पुरावे व कायदेशीर प्रक्रियेच्या आधारे निश्चित व्हावे, अशी भूमिका मांडण्यात आली.
‘प्रत्येक पुरावा तपासा, सत्य समोर आणा’
या प्रकरणी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात FIR क्रमांक 0682/2026 दाखल असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तपासादरम्यान कोणताही महत्त्वाचा पुरावा दुर्लक्षित होऊ नये, यासाठी अपघातस्थळासह संपूर्ण मार्गावरील CCTV फुटेज तातडीने सुरक्षित करून त्याची तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
तसेच प्रत्यक्षदर्शींचे जबाब नोंदविणे, संबंधित वाहनाचा वेग, ब्रेक, स्टिअरिंग आणि तांत्रिक स्थितीची वैज्ञानिक तपासणी करणे, चालकाच्या मद्यप्राशनाची शक्यता तपासणे, तसेच Breath Analyzer, रक्त नमुना, FSL अहवाल आणि Chain of Custody यांची पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली.
आरोपीच्या उपचारांशी संबंधित MLC व वैद्यकीय नोंदी, तसेच PCR/MCR, GD/Station Diary, अटक आणि रिमांडशी संबंधित नोंदी तपासाचा भाग बनवाव्यात, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे. मृतक आणि जखमींचे MLC, पोस्टमॉर्टेम अहवाल तसेच इतर वैद्यकीय कागदपत्रे सुरक्षित ठेवून त्यांचा तपासात योग्य वापर करावा, अशी मागणी करण्यात आली.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासाची स्वतंत्र समीक्षा करण्याची मागणी
अपघाताच्या तपासाची वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून स्वतंत्र समीक्षा करण्यात यावी, अशी मागणी कँडल मार्चमध्ये सहभागी नागरिकांनी केली. तपासातील प्रत्येक महत्त्वाचा पुरावा सुरक्षित ठेवून त्याची निष्पक्षपणे पडताळणी झाल्यासच घटनेमागील संपूर्ण वस्तुस्थिती स्पष्ट होईल, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
पीडित कुटुंबाला मदत व विधी सहाय्य द्या
बबलू कुलमेठे यांच्या कुटुंबीयांना कायद्यानुसार उपलब्ध नुकसानभरपाई, शासकीय मदत आणि विधी सहाय्य मिळावे, अशी मागणीही करण्यात आली. कँडल मार्चच्या माध्यमातून सहभागी नागरिकांनी स्पष्ट केले की, त्यांचा उद्देश कोणत्याही व्यक्तीला न्यायालयीन निर्णयापूर्वी दोषी ठरविण्याचा नसून अपघाताची सत्यता निष्पक्ष तपासातून समोर आणणे आणि पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देणे, हा आहे. संविधान चौकात कँडल पेटवत सहभागी नागरिकांनी “बबलू कुलमेठे यांना न्याय मिळालाच पाहिजे”, “निष्पक्ष चौकशी झालीच पाहिजे” आणि “सत्य समोर आलेच पाहिजे”, अशा घोषणा देत तपासात पारदर्शकतेची मागणी केली.
Author: संतोष तायडे
संपादक















