‘फॉरेन ग्रूम’च्या आमिषाचा आंतरराज्यीय भामटा रॅकेट उघड!

– दुबई हवाला कनेक्शनचा संशय; नागपूर क्राइम ब्रँचच्या युनिट-३ व सायबर पथकाची कारवाई, गुजरातमधील ७ जण ताब्यात
– कारसह ८ मोबाईल, दोन दुचाकी व रोख रक्कम असा १८.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

The Exposer
नागपूर : परदेशातून भारतात येऊन लग्न करण्याचे आमिष दाखवून महिलेला लाखो रुपयांचा गंडा घालण्याच्या कथित प्रकाराचा नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-३ आणि सायबर पथकाने पर्दाफाश केला आहे. ‘फॉरेन ग्रूम’च्या नावाने फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीतील सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून, या रॅकेटचे आंतरराष्ट्रीय हवाला नेटवर्कशी संबंध असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

गणेशपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा क्र. ४३३/२०२६ अनुषंगाने ही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4), 319(2), 204, 3(5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(ड) अंतर्गत गुन्हा दाखल आहे.

‘परदेशी वर’ बनून जाळ्यात ओढले

या प्रकरणातील फिर्यादीशी एका अनोळखी व्यक्तीने मोबाईलवरून संपर्क साधला. ओळख वाढल्यानंतर त्याने भारतात येऊन लग्न करून स्थायिक होण्याची इच्छा व्यक्त केली. तसेच आपला सोन्याचा व्यवसाय असून यूकेमध्ये कपड्यांचा मॉल असल्याचे सांगितल्याचा आरोप आहे.

त्यानंतर संबंधित व्यक्तीने फिर्यादीसाठी ७० तोळे सोने आणि ७० हजार अमेरिकन डॉलर घेऊन भारतात येत असल्याचे सांगितले. मात्र, दिल्ली विमानतळावर कस्टम विभागाने त्याला पकडल्याचे सांगून १३ लाख ९२ हजार रुपये भरण्याची गरज असल्याचे खोटे कारण पुढे करण्यात आले.
या आमिषाला बळी पाडत आरोपींनी फिर्यादीकडून वेगवेगळ्या कारणांनी वारंवार पैसे उकळल्याचा आणि एकूण सुमारे २० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.

सायबर पथकाच्या तांत्रिक विश्लेषणाने रॅकेटचा माग काढला

गुन्हे शाखा युनिट-३च्या अधिकाऱ्यांनी सायबर पथकाच्या मदतीने तांत्रिक विश्लेषण सुरू केले. फिर्यादीची आणखी फसवणूक करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी फिर्यादीच्या मदतीने सापळा रचला आणि सात जणांना ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या व्यक्तींची चौकशी केली असता, नागपूर शहरातून आंतरराज्यीय तसेच आंतरराष्ट्रीय स्वरूपाचे रॅकेट चालविले जात असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाल्याचे सांगण्यात आले आहे.

हवाला कनेक्शनची शक्यता; तपासाची दिशा आंतरराष्ट्रीय नेटवर्ककडे

या प्रकरणात हवाल्याशी संबंधित आंतरराष्ट्रीय रॅकेटचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे या टोळीचा आर्थिक व्यवहार, मोबाईल संपर्क, डिजिटल व्यवहार तसेच देश-विदेशातील संभाव्य कनेक्शन याबाबत तपासाला महत्त्व प्राप्त झाले आहे.

१८.४५ लाखांचा मुद्देमाल जप्त

कारवाईदरम्यान पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला. यामध्ये हॅरियर कंपनीचे चारचाकी वाहन — ₹१५ लाख, दोन दुचाकी — ₹१.६० लाख, ८ मोबाईल फोन — ₹१.७० लाख, रोख रक्कम — ₹१५ हजार, असा एकूण जप्त मुद्देमाल : ₹१८.४५ लाख रुपयाचा आहे.

ताब्यात घेतलेल्या सातही संशयितांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील कार्यवाहीसाठी गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. या टोळीमागील सूत्रधार कोण, परदेशातील संपर्क कोणाशी होते आणि कथित हवाला नेटवर्कशी नेमका काय संबंध आहे, याचा तपास आता पोलिसांकडून सुरू आहे.

अटक करण्यात आलेल्या 7 आरोपींची नावे 

अटक करण्यात आलेल्या आरोपीमध्ये जेयष अमृतजी ठाकुर (वय २० वर्षे) — रा. चद्रमाना, ता. पाटण, राज्य गुजरात, यशपाल आमसिंग चैहान (वय २४ वर्षे) — रा. चंदाना, ता. वाव, जि. बनासकांठा, राज्य गुजरात, कुलदिपसिंग विक्रमजी जडेजा (वय २६ वर्षे) — रा. पर, ता. सहातलपुर, जि. पाटण, राज्य गुजरात, राजेन्द्र सिंग राणाजी वाघेला (वय ३४ वर्षे) — रा. किडाणा, ता. गांधीधाम, जि. कच्छ, राज्य गुजरात, नरपत बाबु सिंग (वय २७ वर्षे) — रा. वातम, ता. दियोधर, जि. बनासकाठा, राज्य गुजरात, उपेन्द्र नागजीभाई जोषी (वय २८ वर्षे) — रा. ईसा, जि. बनासकाठा, राज्य गुजरात, भानुसिंग जसवंतसिंग वाघेला (वय २९ वर्षे) — रा. दियोधर, जि. वावथरात, राज्य गुजरात यांचा समावेश आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाची उल्लेखनीय कामगिरी

संबंधित गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावत गुन्ह्याचा छडा लावण्यासाठी प्रभावीपणे काम केले. तपासाची दिशा निश्चित करण्यापासून संशयितांचा माग काढणे, तांत्रिक माहितीचे विश्लेषण करणे तसेच आवश्यक पुरावे संकलित करण्यापर्यंत विविध पातळ्यांवर पथकाने कामगिरी बजावली.

या संपूर्ण कारवाईस पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, तसेच सहपोलीस आयुक्त (गुन्हेशाखा) वैभव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. तपास पथकात पोलीस निरीक्षक अतुल मोहनकर, पोलीस उपनिरीक्षक अमोल देशमुख, मधुकर काठोके, सपोनि. ईश्वर खोरडे, संतोषसिंग ठाकूर, पोहवा विजय श्रीवास, अजय पाटील, मनोज नेवारे, पोअं. जितेश रेड्डी, विवेक भोयर, दीपक लकडे, दीपक दासरवार, चंद्रशेखर डेकाटे, प्रमोद देशभतार, चापोहवा अनिल बोटेरे, चापोअं. विशाल रोकडे, मंगेश मैत्राम तसेच सायबर सेलचे पोउपनि. विवेक झिंगरे व त्यांच्या पथकाचा सहभाग राहिला. विशेषतः सायबर सेलच्या तांत्रिक मदतीमुळे तपासातील महत्त्वाचे धागेदोरे मिळण्यास हातभार लागला.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More