नंदनवन पोलिसांचा धडाका! १४ वर्षीय विधिसंघर्ष बालकाकडून ९ चोरीच्या दुचाकी जप्त; घरफोडीचाही छडा

– तब्बल ६ लाखांचा मुद्देमाल हस्तगत; नंदनवनसह कोतवाली हद्दीतील गुन्हे उघडकीस — वाहनचोरीच्या साखळीचा पर्दाफाश

The Exposer
नागपूर : नंदनवन परिसरात दुचाकी चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी राबविलेल्या विशेष तपास मोहिमेत १४ वर्षीय विधिसंघर्ष बालकाला ताब्यात घेत तब्बल ९ चोरीच्या दुचाकी, चोरीचा मोबाईल तसेच घरफोडीत चोरलेला सोन्याचा दागिना व इतर साहित्य असा सुमारे ६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नंदनवनसह कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक गुन्ह्यांचा छडा लागला आहे.

नंदनवन येथील प्रकाश भोयर यांच्या घरासमोर पार्क केलेली ॲक्टिव्हा मोपेड अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपासाला वेग दिला. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित विधिसंघर्ष बालकाचा शोध घेतला. ताब्यात घेतल्यानंतर अधिक चौकशी केली असता त्याने नंदनवन परिसरातील घरफोडी तसेच शहरातील विविध ठिकाणांहून दुचाकी चोरी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

९ दुचाकींसह सोन्याचे दागिने आणि अन्य साहित्य

तपासादरम्यान पोलिसांनी विविध रंगांच्या ॲक्टिव्हा, पल्सर आणि प्लॅटिना अशा ९ दुचाकी हस्तगत केल्या. याशिवाय घरफोडीच्या गुन्ह्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाची सोन्याची बांगडी, टायटन कंपनीचे घड्याळ, कानातील टॉप्स, मण्यांची माळ, इअरबड्स आणि चष्मा असा मुद्देमालही जप्त करण्यात आला. पोलिसांच्या नोंदीनुसार हस्तगत करण्यात आलेल्या मुद्देमालाची एकूण किंमत सुमारे ६ लाख रुपये आहे.

नंदनवनचे ५, कोतवालीतील १ गुन्हा उघड

या कारवाईत नंदनवन पोलीस ठाण्यातील पाच गुन्हे आणि कोतवाली पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याचा छडा लागल्याचे तपास पथकाने नमूद केले आहे. उर्वरित जप्त वाहनांबाबतही अभिलेख पडताळणी सुरू असून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त रश्मिता राव, सहायक पोलीस आयुक्त महेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली

नंदनवन पोलीस ठाण्याचे वपोनि कैलास देशमाने, सपोनि उमाकांत राठोड, पोउपनि संतोषकुमार रामलोड, पोहवा दिनेश जुगनाहाके, पोशि प्रवीण मरापे, पोशि राहुल खळतकर आणि मपोहेवा स्वाती कुमरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More