– कळमणा पोलिसांच्या कारवाईत सहा गुन्हे उघड; सोने-चांदी व तीन वाहने असा ३.७७ लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : भांडेवाडी परिसरातील घरफोडी व वाहनचोरीच्या घटनांचा तपास करताना भांडेवाडी पोलिसांनी तिघांना अटक करून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा केला आहे. आरोपींकडून सोन्याचे व चांदीचे दागिने तसेच तीन वाहने असा एकूण ३ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांडेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान तांत्रिक पद्धतीने तपास तसेच विश्वासू बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांचा शोध घेण्यात आला. तपासादरम्यान आकाश उर्फ अक्षय प्रभुजी शेंडे (२६), रुपेश महेश यादव (२१) आणि शुभम उर्फ सुयोग उर्फ आंबा राकेश नेरकर (२३) यांना ताब्यात घेण्यात आले.
घरफोडीच्या तपासातून चोरीच्या गुन्ह्यांची मालिकाच उघड
भांडेवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्याच्या तपासात आरोपींचा माग काढण्यात पोलिसांना यश आले. चौकशीतून भांडेवाडी तसेच कळमणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आणखी पाच घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
यामध्ये भांडेवाडी पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक १०९/२०२६, १६७/२०२६ व १५२/२०२६, तर कळमणा पोलीस ठाण्यातील गुन्हा क्रमांक ९५४/२०२५ व ५०७/२०२६ यांचा समावेश आहे. यासह भांडेवाडी पोलीस ठाण्यातील मूळ गुन्हा क्रमांक १४२/२०२६ धरून एकूण सहा गुन्हे उघडकीस आणल्याचे प्रेस नोटमध्ये नमूद आहे.
सोने-चांदीसह तीन वाहने जप्त
पोलिसांनी केलेल्या कारवाईत २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा रवा – ₹३० हजार, २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा रवा – ₹२० हजार, २ ग्रॅम वजनाचा सोन्याचा रवा – ₹२० हजार, ४ ग्रॅम वजनाचा सोन्याचा रवा – ₹४२ हजार, ५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा रवा – ₹६० हजार, ४२० ग्रॅम वजनाची चांदीची लगड – ₹६२ हजार, ३० ग्रॅम वजनाची चांदीची लगड – ₹३,५००, MH 31 FT 8653 क्रमांकाची स्प्लेंडर मोटारसायकल – ₹४० हजार, MH 49 BD 4750 क्रमांकाची अॅक्टिव्हा मोपेड – ₹५० हजार, MH 49 X 7251 क्रमांकाची अॅक्टिव्हा मोपेड – ₹५० हजार, असा एकूण ₹३,७७,५०० किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
२० जूनच्या घरफोडीपासून तपासाला सुरुवात
पोलिसांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, २० जून २०२६ रोजी सकाळी ८.३० ते २२ जून रोजी सकाळी ११.३० वाजेदरम्यान फिर्यादीच्या हनुमाननगर, भांडेवाडी परिसरातील घरात चोरीची घटना घडली होती. या प्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करण्यासोबतच विश्वासू बातमीदारांकडून माहिती मिळवून आरोपींचा शोध घेतला. आरोपी मिळून आल्यानंतर त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पुढील तपासात भांडेवाडी व कळमणा परिसरातील आणखी पाच गुन्ह्यांचे धागेदोरे समोर आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई
ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त झोन- ५, सहायक पोलीस आयुक्त रोहित ओव्हाळ यांच्या मार्गदर्शनाखाली भांडेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चरडे, पोलीस उपनिरीक्षक दिपक चांदकर, पोलीस हवालदार अश्विन बडगे, पोलीस हवालदार सुनील वानखेडे, पोलीस अंमलदार मिलिंद ठाकरे तसेच इतर पोलिस कर्मचाऱ्यांनी केली.
Author: संतोष तायडे
संपादक















