– सीताबर्डी पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव; निष्पक्ष चौकशीसाठी सीपींकडे धाव
– प्रवासाचे व्हिडीओ, रेल्वे तिकीट व डिजिटल पुरावे जोडल्याचा दावा
The Exposer
नागपूर : कथित घटना घडली त्या दिवशी आपण शहरातच नव्हतो, तरीही गुन्ह्यात आरोपी म्हणून नाव कसे आले? असा थेट सवाल उपस्थित करीत वेबचॅनलचे संपादक विजयकुमार खवसे यांनी सीताबर्डी पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. २३ सप्टेंबर रोजी सीताबर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात आपले नाव आरोपी क्रमांक तीन म्हणून नमूद करण्यात आल्याचा दावा करीत खवसे यांनी नागपूरचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्याकडे निष्पक्ष चौकशी करून एफआयआरमधून नाव वगळण्याची मागणी केली आहे.
घटनेच्या वेळी नागपुरात नव्हतो
खवसे यांच्या निवेदनानुसार, गुन्ह्यात नमूद कथित घटना १५ मे २०२५ रोजी दुपारी ३ ते सायंकाळी ४ वाजेदरम्यान घडल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र त्या काळात आपण नागपूरमध्ये नसून पत्रकारितेच्या कामानिमित्त राज्याबाहेर प्रवासात होतो, असा त्यांचा दावा आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १४ मे रोजी बोधगया येथून प्रयागराजकडे रेल्वेने प्रवास केला. त्यानंतर कटनी येथे उतरून पुढील प्रवास केला आणि १५ मे रोजी सायंकाळी सुमारे ६ ते ७ वाजता नागपूर रेल्वेस्थानकावर पोहोचलो, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
डिजिटल पुरावे पोलिसांसमोर
आपण घटनेच्या वेळी नागपुरात नसल्याचे सिद्ध करण्यासाठी रेल्वे प्रवासाशी संबंधित व्हिडीओ, स्क्रीनशॉट आणि अन्य डिजिटल पुरावे पोलिसांकडे सादर केल्याचे खवसे यांनी म्हटले आहे. त्यामुळे तपास यंत्रणेने या पुराव्यांची पडताळणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
‘दिशाभूल करून नाव गोवले’ असा आरोप
दिशाभूल करणाऱ्या माहितीच्या आधारे आपले नाव हेतुपुरस्सर गुन्ह्यात जोडण्यात आल्याचा आरोपही निवेदनातून करण्यात आला आहे. भविष्यात अशा प्रकारे विनाकारण कोणालाही गुन्ह्यात गोवले जाऊ नये, यासाठी संबंधितांची जबाबदारी निश्चित करून कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करून वस्तुस्थिती समोर आणावी, एफआयआरमधून आपले नाव वगळण्याबाबत कायदेशीर कार्यवाही करावी, तसेच या संदर्भातील निवेदन खवसे यांनी गृहमंत्र्यांकडेही पाठविले आहे. आता पोलिस तपासात सादर करण्यात आलेल्या डिजिटल व प्रवासाच्या पुराव्यांची पडताळणी केल्यानंतर या आरोपांमागील वस्तुस्थिती काय आहे, हे स्पष्ट होणार आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















