वेकोलीत ‘२ टक्के’चा खेळ; ४० हजारांची लाच घेताना वरिष्ठ पर्यवेक्षक जाळ्यात!

– सीबीआयच्या एसीबी पथकाची उमरेडमध्ये धडक कारवाई; बिल मंजुरीसाठी मागितली होती ५० हजारांची लाच

The Exposer
नागपूर, ३० सप्टेंबर : बिल मंजूर करण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करणाऱ्या वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडच्या (डब्ल्यूसीएल) उमरेड खाण प्रकल्पातील वरिष्ठ पर्यवेक्षकाला केंद्रीय अन्वेषण ब्युरोच्या (सीबीआय) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बुधवारी रंगेहाथ पकडले. पवन नखाते असे अटक करण्यात आलेल्या वरिष्ठ पर्यवेक्षकाचे नाव आहे. उमरेड येथील गंगापूर चौकाजवळ सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.

तक्रारदाराला पीरवा गावातील पुनर्वसनस्थळी पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी दोन कूपनलिका बांधणे, तसेच अंतर्गत मुख्य व वितरण जलवाहिनीसह सबमर्सिबल पंप बसविण्याचे कंत्राट मिळाले होते. या कामाची एकूण किंमत २५ लाख ३५ हजार ६९३ रुपये होती.

या कामाच्या तिसऱ्या बिलाची रक्कम मंजूर करण्यासाठी पवन नखाते याने तक्रारदाराकडे बिलाच्या दोन टक्के रकमेच्या नावाखाली ५० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. याबाबत तक्रारदाराने २९ सप्टेंबर रोजी सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे लेखी तक्रार केली.

पडताळणीत लाचेची मागणी उघड

तक्रारीची स्वतंत्र साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान नखाते याने २२ लाख रुपयांच्या भरलेल्या रकमेच्या दोन टक्क्यांप्रमाणे ४४ हजार रुपये, तसेच मागील थकीत १० हजार रुपये, अशी एकूण ५४ हजार रुपयांची मागणी केल्याचे तपासात समोर आल्याचे सीबीआयकडून सांगण्यात आले. त्यानंतर लाचेची रक्कम ५० हजार रुपयांवर निश्चित करण्यात आली.

पहिला हप्ता घेताच सीबीआयचा सापळा

ठरल्याप्रमाणे बुधवारी उमरेडच्या गंगापूर चौक परिसरात सीबीआयच्या एसीबी पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून ४० हजार रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताच पवन नखाते याला पथकाने रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा, १९८८ (२०१८ ची सुधारणा) मधील कलम ७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घराची झडती; आणखी कोणाचा सहभाग?

नखाते याला अटक केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू होती. या लाचखोरीच्या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच लाचेच्या मागणीमागे अन्य व्यक्ती किंवा अधिकारी आहेत का, याचा तपास सीबीआयच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून करण्यात येत आहे. वेकोलीसारख्या सार्वजनिक क्षेत्रातील महत्त्वाच्या कंपनीतील वरिष्ठ पर्यवेक्षकावर झालेल्या या कारवाईमुळे खळबळ उडाली असून, तपासातून पुढे काय निष्पन्न होते याकडे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More