– छत्तीसगड ते नागपूर गांजा तस्करीचा पर्दाफाश; चार आरोपी अटकेत, दोन कारवायांत १७.३४ लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : वाहनावर ‘प्रेस’ लिहिल्याने पोलिसांची नजर चुकवता येते, असा समज करून घेतलेल्या गांजा तस्करांवर मौदा पोलिसांनी कारवाई केली आहे. छत्तीसगडहून नागपूरच्या दिशेने गांजाची वाहतूक करणाऱ्या बलेनो कारमधून २०.०४८ किलो गांजा जप्त करण्यात आला. या वाहनात ‘F-BHARAT 24 NEWS’ असे लिहिलेले साहित्य, व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरा, मायक्रोफोन आणि अन्य वस्तू आढळल्या. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली असून, दोन स्वतंत्र कारवायांत एकूण १७ लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईमुळे वाहनांवर ‘प्रेस’ लिहून पत्रकारितेच्या ओळखीचा गैरवापर केला जात आहे का, हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मात्र, जप्त वाहनावरील साहित्याचा वापर गांजा तस्करीसाठीच केला जात होता का, याबाबतचा अंतिम निष्कर्ष तपासातून स्पष्ट होणे आवश्यक आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, १० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री गस्तीवर असताना मौदा पोलिसांना छत्तीसगडहून नागपूरकडे बलेनो कारमधून गांजाची अवैध वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर महादुला फाटा, बोरगाव परिसरात नाकाबंदी करण्यात आली. सीजी ०४ पीएक्स ६२८३ क्रमांकाची संशयित कार अडवून झडती घेतली असता त्यामध्ये २०.०४८ किलो गांजा आढळून आला.
या कारवाईत धनुर्जय विजय परमार (वय ३४) आणि सोकीलाल प्रेमलाल बंजारा (वय ४०), दोघेही छत्तीसगडमधील महासमुंद जिल्ह्यातील रहिवासी, यांना अटक करण्यात आली. गांजासह बलेनो कार, दोन मोबाइल फोन, व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरा, मायक्रोफोन आणि अन्य साहित्य असा सुमारे ११ लाख २४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
माथनी फाट्यावर दुसरी कारवाई; आणखी दोघे जाळ्यात
गांजाच्या पुढील व्यवहाराचा तपास करताना पोलिसांनी शुभम दामोदर बडे (वय ३१) आणि दामोदर लक्ष्मण बडे (वय ६५), दोघेही पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील नारायणगाव परिसरातील रहिवासी, यांना माथनी टोल नाका परिसरातून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार आणि तीन मोबाइल फोन असा सुमारे सहा लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दोन्ही कारवायांत चार आरोपींना अटक करून एकूण १७ लाख ३४ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, गांजाचा पुरवठा, वाहतूक आणि पुढील व्यवहारांची साखळी शोधण्याचे काम सुरू आहे.
नागपूर शहर आणि ग्रामीण भागात ‘प्रेस’ वाहनांचा सुळसुळाट?
मौदा पोलिसांच्या कारवाईनंतर नागपूर शहर आणि नागपूर ग्रामीण परिसरातील वाहनांवर ‘प्रेस’ लिहिण्याच्या प्रकाराकडे पुन्हा लक्ष वेधले गेले आहे. शहरात आणि ग्रामीण भागात अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांवर ‘प्रेस’ लिहिलेले दिसते. काही खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’ असे लिहिलेले असल्याचेही निदर्शनास येते. तसेच, काही अवैध प्रवासी वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांवरही ‘प्रेस’चा उल्लेख असल्याच्या तक्रारी समोर येतात.
मात्र, या वाहनांची अधिकृत नोंदणी, संबंधित व्यक्तींची पात्रता आणि अशा उल्लेखांचा वापर नियमांनुसार आहे की नाही, याची व्यापक तपासणी झाली आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) आणि पोलीस विभागाने संयुक्त तपासणी मोहीम राबविण्याची गरज अधोरेखित होत आहे.
मौदा पोलिसांच्या कारवाईने एक महत्त्वाचा मुद्दा समोर आणला आहे. वाहनावर ‘प्रेस’ लिहिलेले असणे म्हणजे संबंधित वाहनाला कायद्यापासून सूट मिळते, असे नाही. त्याचप्रमाणे, ‘महाराष्ट्र शासन’ असा उल्लेख असला तरी वाहनाची अधिकृत ओळख आणि कागदपत्रे तपासण्याचा अधिकार संबंधित यंत्रणांना आहे.
त्यामुळे नागपूर शहर व ग्रामीण भागातील वाहनांवरील अशा उल्लेखांची पडताळणी, बनावट ओळख वापरणाऱ्यांवर कारवाई आणि नियमभंग करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याची मागणी जोर धरू शकते. पत्रकारितेची ओळख असो किंवा शासकीय असल्याचा दावा—तिचा गैरवापर करून कायद्याला बगल देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याची निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
मौदा पोलिसांच्या कारवाईकडे लक्ष
ही कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष ए. पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के आणि संबंधित उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मौदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक भारत लसंते यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली.
Author: संतोष तायडे
संपादक















