– झोन-२ मध्ये ६ पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील रुग्णालयांचा समावेश; QR कोडद्वारे बीट पोलिसांशी समन्वय साधणे होणार सोपे
The Exposer
नागपूर : रुग्णालयांमधील कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न वेळीच हाताळण्यासाठी आणि पोलीस व वैद्यकीय यंत्रणेमधील समन्वय अधिक मजबूत करण्यासाठी नागपूर शहर पोलिसांनी महत्त्वपूर्ण पुढाकार घेतला आहे. परिमंडळ क्रमांक २ च्या पोलीस उपायुक्त अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोलीस–मेडिकल कनेक्ट डायरेक्टरी’ तयार करण्यात आली असून, यामध्ये सहा पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील तब्बल ८६ रुग्णालयांचा समावेश करण्यात आला आहे.
या विशेष डायरेक्टरीमुळे रुग्णालय प्रशासनाला संबंधित बीट पोलीस अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक (Sr. PI), सहायक पोलीस आयुक्त (ACP) आणि पोलीस उपायुक्त (DCP) यांच्याशी थेट संपर्क साधणे शक्य होणार आहे.
एका क्लिकवर संबंधित पोलिसांची माहिती!
या डायरेक्टरीमध्ये प्रत्येक रुग्णालयाचे नाव व पत्ता, संबंधित डॉक्टर आणि रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संपर्क क्रमांक, तसेच संबंधित बीट अधिकारी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, एसीपी आणि डीसीपी यांची नावे व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. याशिवाय, रुग्णालयाच्या जवळील QR कोड पॉइंटची माहितीही समाविष्ट करण्यात आली आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाला कोणत्या पोलीस अधिकाऱ्याशी संपर्क साधायचा, याबाबत होणारा संभ्रम दूर होण्यास मदत होणार आहे.
बीट मार्शल करणार नियमित पाहणी
या उपक्रमांतर्गत बीट मार्शल संबंधित QR कोड नियमितपणे स्कॅन करून रुग्णालयातील सुरक्षा कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. त्यामुळे पोलीस आणि रुग्णालय प्रशासन यांच्यात सातत्यपूर्ण संपर्क राहण्यास मदत होईल. रुग्णालयातील सुरक्षेच्या समस्या तसेच संभाव्य कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीची माहिती वेळेत मिळण्याचा मार्गही मोकळा होणार आहे.
गंभीर वैद्यकीय परिस्थितीत आधीच मिळणार पोलिसांना सूचना
रुग्णालयांमध्ये गंभीर वैद्यकीय उपचार सुरू असताना डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना रुग्णांच्या उपचारांवर लक्ष केंद्रित करता यावे, यासाठी संभाव्य तणावपूर्ण परिस्थितीची पूर्वसूचना संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे वाद, गोंधळ किंवा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे शक्य होऊ शकते.
रुग्णालय प्रशासनाला संबंधित पोलीस अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे किंवा तयार करण्यात आलेल्या समूहाच्या माध्यमातून संपर्क साधता येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत ११२ या आपत्कालीन क्रमांकावरही संपर्क साधता येईल.
पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील समन्वयाला बळ

या समूहामध्ये आणखी रुग्णालयांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना सहभागी करून घेण्यात येणार आहे. तसेच, अधिकाधिक रुग्णालयांना भेटी देऊन तेथील प्रशासनाशी प्रत्यक्ष संवाद साधण्याचा मानस डीसीपी अन्नपूर्णा सिंह यांनी व्यक्त केला आहे. रुग्णालयांमधील सुरक्षितता, तातडीचा पोलीस संपर्क आणि संभाव्य अनुचित घटनांना प्रतिबंध या दृष्टीने ही डायरेक्टरी महत्त्वपूर्ण ठरण्याची अपेक्षा आहे. ‘वेळेवर संपर्क, तत्पर प्रतिसाद आणि प्रभावी समन्वय’ या माध्यमातून नागपूर पोलिसांनी पोलीस व वैद्यकीय समुदायातील समन्वय अधिक सक्षम करण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक















