– आर्थिक फायद्यासाठी महिलेला देहव्यापारास प्रवृत्त केल्याचा आरोप
– सामाजिक सुरक्षा विभाग आणि AHTU पथकाची MIDC परिसरात छापेमारी
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांकडून देहव्यापार करून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. महिलांना कमी वेळेत जास्त पैसे कमावण्याचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करणे आणि ग्राहक उपलब्ध करून देणे, अशा आरोपांवरून सामाजिक सुरक्षा विभाग व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने (AHTU) संयुक्त कारवाई केली. या प्रकरणात ललिता ऊर्फ पूजा संजय यादव (वय ३७, रा. आशीर्वाद नगर, संगम रोड, MIDC, नागपूर) हिच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस ग्राहकाच्या माध्यमातून कारवाई
पोलीस विभागाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिला व मुलींना पैशांचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे दोन पंच आणि बोगस ग्राहकाच्या मदतीने प्लॉट क्रमांक ७०, आशीर्वाद नगर, संगम रोड, MIDC परिसरात छापा टाकण्यात आला.
या कारवाईदरम्यान संशयित महिलेने बोगस ग्राहकाला मध्य प्रदेशातील एका सज्ञान महिलेला शारीरिक संबंधांसाठी उपलब्ध करून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाल्याचे सांगण्यात आले. संबंधित महिलेकडून देहव्यापार करून घेतला जात असल्याचा आरोप आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी १,५०० रुपये रोख, अंदाजे १० हजार रुपये किमतीचा मोबाईल आणि ३० रुपये किमतीचे कंडोमचे एक पाकीट, असा एकूण ११ हजार ५३० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा
या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक ११४१/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहितेचे कलम १४३(२) तसेच अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायदा, १९५६ मधील कलम ३, ४, ५ आणि ७ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. महिला आरोपी आणि संबंधित महिलेला पुढील कायदेशीर कार्यवाहीसाठी MIDC पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा विभाग, गुन्हे शाखा, नागपूर शहर आणि AHTU पथकाने केली. या प्रकरणातील पुढील तपास MIDC पोलीस करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक















