डॉ. यशवंत मनोहर यांना दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचा पहिला जीवनगौरव पुरस्कार!

– १५ ऑक्टोबरला नागपूरमध्ये भव्य जयंती समारोह व जीवनगौरव पुरस्कार सोहळा; मान्यवरांच्या उपस्थितीत साहित्य, समता आणि परिवर्तनवादी विचारांचा गौरव

The Exposer
नागपूर : समता, सामाजिक न्याय आणि परिवर्तनवादी विचारांचे प्रखर पुरस्कर्ते कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त नागपुरात भव्य जयंती समारोह व जीवनगौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक, विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचा पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठान, नागपूर यांच्या वतीने गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर येथील नागसेन सभागृहात हा सोहळा पार पडणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आंबेडकरी साहित्यिक तथा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश जीवने राहणार आहेत. कवयित्री, लेखिका व संशोधक सरिता ताई सातार्डे या प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश कुंभे आणि ज्येष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ते दिनेश शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

साहित्यिक योगदानाचा गौरव; परिवर्तनवादी विचारांना उजाळा

डॉ. यशवंत मनोहर यांनी साहित्य, वैचारिक लेखन आणि सामाजिक परिवर्तनाच्या क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव या पुरस्काराच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानच्या वतीने प्रथमच प्रदान करण्यात येणारा हा जीवनगौरव पुरस्कार सोहळा आंबेडकरी साहित्य आणि परिवर्तनवादी चळवळीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

महापुरुषांचे विचार, समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये समाजात रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित या कार्यक्रमाला साहित्यप्रेमी, आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते, विचारवंत आणि नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव क्षितिज गायकवाड यांनी केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More