– गिट्टीखदानमधील बोरगाव रोडवर मध्यरात्री थरार; आठ जणांची नावे समोर, दोघे पोलिसांच्या ताब्यात, अन्य आरोपींचा शोध सुरू
The Exposer
नागपूर : साऊंड सिस्टिमच्या कामाचे पैसे आणि साऊंड सिस्टिम परत घेण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. अभिजित दिवाण सिडाम असे मृत तरुणाचे नाव असून, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. यां प्रकरणी पोलिसांनी हत्येचे कलम वाढविले आहे.
या हत्याकांडात आठ आरोपींची नावे समोर आली आहे. त्यापैकी दोघे गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार, मृत अभिजित सिडाम याचा साऊंड सिस्टिमचा व्यवसाय होता. देवीच्या कार्यक्रमात बँड वाजविण्याच्या कामासाठी त्याने संबंधित व्यक्तींना बोलावले होते. काम पूर्ण झाल्यानंतर पैशांच्या व्यवहारावरून वाद निर्माण झाला. पैसे न मिळाल्याने संबंधितांनी साऊंड सिस्टिम स्वतःकडे ठेवून घेतल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान, १२ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सुमारे १०.३० ते ११.३० वाजताच्या दरम्यान अभिजित हा आपल्या मित्रासह साऊंड सिस्टिम परत घेण्यासाठी आणि पैशांचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी संबंधितांकडे गेला होता. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. या वादाचे रूपांतर हिंसक हल्ल्यात झाले आणि अभिजितवर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.
मेयो रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू
हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अभिजितला उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. ही घटना बोरगाव रोडवरील दिनशॉ फॅक्टरीसमोर, गोंड मोहल्ल्याजवळील परिसरात घडल्याची माहिती आहे.
आठ जणांची नावे; दोघे पोलिसांच्या ताब्यात
या प्रकरणात पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार पुढील व्यक्तींची नावे समोर आली आहेत. यामध्ये शशांक ऊर्फ दादू ऊर्फ लकवा सडमाके, डावो ऊर्फ अंकित वानखडे, हर्ष कुळमेथे, नयन देव कुळमेथे, उमेश ऊर्फ रमेश तिलक सडमाके, लकी उईके, रा. पिटेसूर, यादेश सडमाके, शंभू नावाचा, लांब केस असलेला इसम, रा. टेका नाका, शेंडे नगर यां आरोपींचा समावेश आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, यातील हर्ष कुळमेथे आणि उमेश ऊर्फ रमेश तिलक सडमाके हे दोघे गिट्टीखदान पोलिसांच्या ताब्यात आहेत. उर्वरित आरोपी व्यक्तींचा शोध सुरू आहे. मुख्य चाकू मारणारा आरोपी म्हणून शशांक ऊर्फ दादू ऊर्फ लकवा सडमाके याचे नाव प्राथमिक माहितीत नमूद करण्यात आले आहे.
साऊंड सिस्टिमच्या पैशांवरून सुरू झालेला वाद एका तरुणाच्या मृत्यूपर्यंत पोहोचल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. या हल्ल्यात नेमकी कोणाची काय भूमिका होती, प्रत्यक्ष हल्ल्यात किती जण सहभागी होते आणि उर्वरित आरोपी कधी पकडले जातात, याकडे आता लक्ष लागले आहे.
The Exposer — Depth, Truth & Impact
Author: संतोष तायडे
संपादक















