हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा! १३ जणांवर कारवाई; १५ हजारांचा मुद्देमाल जप्त

– अंबाझरीतील ‘9 Lounge’ वर सामाजिक सुरक्षा पथकाची धडक
– मालक, मॅनेजरसह १० ग्राहकही कारवाईच्या कचाट्यात

The Exposer
नागपूर : शहरातील हुक्का पार्लरमधील कथित बेकायदेशीर प्रकारांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ‘9 Lounge’ हुक्का पार्लरवर छापा टाकला. या कारवाईत पार्लरचा मालक, मॅनेजर आणि एका कामगारासह एकूण १३ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली.

पोलिसांनी घटनास्थळावरून हुक्का पॉट, विविध फ्लेवर्स आणि हुक्का ओढण्यासाठी वापरले जाणारे साहित्य असा एकूण १५ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस आयुक्तांच्या अधिसूचनेचे उल्लंघन केल्याचा आरोप

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १३ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळी ६.१५ ते रात्री १०.३० वाजेदरम्यान गांधीनगर हिल रोड परिसरातील ‘9 Lounge’ हुक्का पार्लर येथे छापा टाकण्यात आला. या वेळी पार्लरमध्ये ग्राहकांना हुक्क्याच्या माध्यमातून तंबाखूजन्य पदार्थ उपलब्ध करून दिले जात असल्याचे आणि त्यासाठी आवश्यक सुविधा पुरविल्या जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. तसेच, नागपूर शहर पोलीस आयुक्तांनी ७ ऑक्टोबर २०२६ रोजी जारी केलेल्या अधिसूचनेतील निर्देश क्रमांक १ चे उल्लंघन झाल्याचा आरोप पोलिसांनी केला आहे.

मालक, मॅनेजरसह १० ग्राहकांवर कारवाई

या कारवाईत आरोपीमध्ये एकूण १३ जणांचा समावेश आहे. यामध्ये पार्लरचा मालक अभिषेक शिखरचंद जैन (वय ४१) — रा. परवापुरा, जैन मंदिराजवळ, मॅनेजर निखिल संजय खोब्रागडे (वय ३७) रा. धरमपेठ, रुद्र अवतार प्रेसजवळ, कामगार रुपेश कृष्णराव वानखेडे (वय ३०), रा. गांधीनगर, मारुती सुझुकी शोरूमजवळ, यांच्यासह घटनास्थळी उपस्थित असलेल्या अन्य १० ग्राहकांवरही कारवाई करण्यात आली.

हुक्का साहित्य जप्त; अंबाझरी पोलिसांकडे पुढील तपास

या प्रकरणी भारतीय न्याय संहितेतील कलम २२३ व २७२ तसेच सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम, २००३ मधील नमूद कलमांनुसार गुन्हा नोंदविण्याची कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. जप्त केलेल्या साहित्यांसह संबंधित आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी अंबाझरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. दुसरीकडे सामाजिक सुरक्षा विभागाच्या या कारवाईने अंबाझरी पोलिसांच्या कार्यतत्परतेवर प्रश्न निर्माण झाला आहे. येथील खुपीया व डिबी पथक करते तरी काय, अशी ही आता चर्चा रंगली आहे.

त्यामुळे हुक्का पार्लरमधील नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागातील पोलिस पथकाची नजर असून, संबंधित प्रकरणात पुढील कायदेशीर कारवाईकडे लक्ष लागले आहे. ही कारवाई सामाजिक सुरक्षा पथक, गुन्हे शाखा, नागपूर शहर यांनी पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या नेतृत्वाखाली केली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More