– अनेक पुरस्कार नाकारणाऱ्या ज्येष्ठ साहित्यिकांचा दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानकडून गौरव; वैचारिक निष्ठेचा सन्मान
The Exposer
नागपूर : वैचारिक भूमिका ठाम, स्वाभिमानाशी तडजोड नाही आणि परिवर्तनवादी विचारांशी अखंड निष्ठा! आपल्या साहित्यिक व वैचारिक भूमिकेसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ साहित्यिक, लेखक आणि विचारवंत डॉ. यशवंत मनोहर यांना कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठान, नागपूरच्या वतीने पहिला ‘जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी त्यांच्या घरी हा पुरस्कार प्रदान केला. अशाप्रकारे त्यांच्या साहित्यिक योगदानासह सामाजिक न्याय, समता आणि आंबेडकरी विचारधारेप्रती असलेल्या निष्ठेचा या पुरस्काराच्या माध्यमातून गौरव करण्यात आला.
पुरस्कार स्वीकारला, वैचारिक निष्ठेचा गौरव!
डॉ. यशवंत मनोहर यांनी आपल्या साहित्यिक प्रवासात अनेक पुरस्कार नाकारून वैचारिक स्वाभिमानाची भूमिका जपली आहे. त्यामुळे त्यांनी कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचा जीवनगौरव पुरस्कार स्वीकारणे ही प्रतिष्ठानसाठी अभिमानाची बाब ठरली आहे. प्रतिष्ठानने प्रसिद्ध केलेल्या गौरव संदेशातून त्यांच्या या निर्णयाबद्दल आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली आहे.

हा सन्मान केवळ एका ज्येष्ठ साहित्यिकाच्या कार्याची पावती नसून, साहित्य, विचार, संघर्ष, स्वाभिमान आणि बौद्धिक नेतृत्व यांचा गौरव करणारा आहे. डॉ. मनोहर यांच्या साहित्याने आणि वैचारिक भूमिकेने परिवर्तनवादी चळवळीला दिलेल्या योगदानाची या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चा होत आहे.
समता आणि सामाजिक न्यायाच्या विचारांना अभिवादन
डॉ. यशवंत मनोहर यांनी साहित्य आणि वैचारिक लेखनाच्या माध्यमातून सामाजिक वास्तव, समता, न्याय आणि परिवर्तनवादी विचार प्रभावीपणे मांडले आहेत. आंबेडकरी विचारधारेचा अभ्यास आणि सामाजिक प्रबोधनाच्या क्षेत्रातील त्यांचे योगदान मराठी साहित्यविश्वात महत्त्वाचे मानले जाते.
कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात आलेला पहिला जीवनगौरव पुरस्कार त्यांच्या या प्रदीर्घ वाटचालीचा सन्मान करणारा ठरला आहे. “वैचारिक खंबीरतेला सलाम, परिवर्तनवादी विचारांना मानाचा मुजरा!” अशा भावना व्यक्त करत प्रतिष्ठानने डॉ. यशवंत मनोहर यांचे अभिनंदन केले असून, त्यांच्या साहित्यिक आणि वैचारिक कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
तर कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड यांच्या जयंती समारोह गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी सायंकाळच्या सुमारास कामठी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरच्या नागसेन सभागृहात पार पडला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष आंबेडकरी साहित्यिक तथा कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचे अध्यक्ष रमेश जिवणे, मुख्य मार्गदर्शक म्हणून कवियत्री, लेखिका, समीक्षक सरिताताई सातार्डे, प्रमुख उपस्थिती कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रकाश कुंभे, वरिष्ठ रिपब्लिकन कार्यकर्ता दिनेश शर्मा व निमंत्रक कर्मवीर पद्मश्री दादासाहेब गायकवाड प्रतिष्ठानचे सचिव क्षितिज गायकवाड हे उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक















