गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावरच धमकीचे आरोप; तपासाची धुरा गुन्हे शाखेच्या एसीपीकडे

– तक्रारदाराला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश; प्रकरणाची चर्चा रंगली
The Exposer
नागपूर : गुन्हे शाखा युनिट क्रमांक ५ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्याविरुद्ध करण्यात आलेल्या धमकीच्या आरोपांच्या प्रकरणात आता गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असल्याचे समोर आले आहे. या संदर्भातील अधिकृत पत्रामुळे प्रकरणाला नवे वळण मिळाले असून पोलिस वर्तुळातही या घडामोडींची चर्चा सुरू आहे. यापूर्वी सदर प्रकरणी कळमना एसीपी यांनी चौकशी करून पीआय गोल्हे यांना क्लीन चिट दिली आहॆ, हे विशेष.
प्राप्त दस्तऐवजानुसार, तक्रारदाराने वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गोल्हे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीची चौकशी गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्त (ACP) कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. यासाठी तक्रारदाराला आवश्यक कागदपत्रांसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
विशेष म्हणजे, ज्या अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आले आहेत ते स्वतः गुन्हे शाखेतील वरिष्ठ अधिकारी असल्याने या चौकशीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. “भूखंड खाली करा, अन्यथा २५ लाख रुपयांच्या खंडणीच्या गुन्ह्यात जेलमध्ये टाकतो,” अशी धमकी दिल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणातील चौकशी अद्याप सुरू असून अंतिम अहवाल किंवा निष्कर्ष सार्वजनिक झालेले नाहीत. त्यामुळे कोणालाही दोषी अथवा निर्दोष ठरविणे अद्याप लवकर ठरणार आहे. मात्र, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यावर झालेल्या गंभीर आरोपांची चौकशी त्याच विभागाच्या वरिष्ठ स्तरावर होत असल्याने या प्रकरणाने नागपूरच्या पोलिस वर्तुळात आणि नागरिकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. आता या चौकशीचा अंतिम अहवाल काय सांगतो आणि आरोपांमध्ये कितपत तथ्य आढळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More