पहाटेची धडक कारवाई : 2,200 लिटर मोह सडवा व 120 लिटर हातभट्टी दारू उद्ध्वस्त

– गुन्हे शाखा युनिट-01 ची हिंगणा हद्दीत मोठी कारवाई; दोन आरोपी ताब्यात

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-01 पथकाने हिंगणा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चंद्रपूर रेठी (ग्रामपंचायत पेठ) परिसरात पहाटेच्या सुमारास धडक कारवाई करत अवैध हातभट्टी दारू निर्मितीचा मोठा अड्डा उद्ध्वस्त केला. या कारवाईत सुमारे 2,200 लिटर मोह फुलाचा सडवा आणि 120 लिटर तयार हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
विश्वासार्ह गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी (दि. 10 जून 2026) पहाटे 5.45 वाजता संबंधित ठिकाणी छापा टाकला. दोन पंचांच्या उपस्थितीत करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात मोह फुलापासून तयार करण्यात येणारी अवैध हातभट्टी दारू, सडवा तसेच दारू निर्मितीसाठी वापरले जाणारे साहित्य आढळून आले.
कारवाईत दीपक रामभाऊ पवार (वय 40) व ज्ञानेश्वर श्रीराम मारवाडी (वय 45) या दोघांना ताब्यात घेण्यात आले. दोघेही चंद्रपूर रेठी, हिंगणा परिसरातील रहिवासी असल्याचे पोलिसांनी सांगितले.
जप्त मुद्देमालामध्ये अंदाजे 2,200 लिटर मोह सडवा, 120 लिटर हातभट्टी दारू, एक चाळणी तसेच जर्मन बनावटीचे तीन मोठे घमेले यांचा समावेश आहे. सडवा मोठ्या प्रमाणात असल्याने तो वाहून नेणे शक्य नसल्यामुळे वरिष्ठांच्या आदेशानुसार पंचांसमक्ष योग्य पद्धतीने नष्ट करण्यात आला. तसेच दारू निर्मितीसाठी वापरलेले प्लास्टिक ड्रम पुन्हा वापरता येणार नाहीत अशा प्रकारे विल्हेवाट लावण्यात आली.
या प्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) व (फ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपासासाठी आरोपी व जप्त मुद्देमाल हिंगणा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली जीपीएसआय ओमप्रकाश कोठे, हवालदार रवींद्र अहिर, सुशांत सोळंके, नितीन वासनिक, योगेश वासनिक, शरद चांभारे, नितीन बोपुलकर आणि मंगेश बोरकुटे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. अवैध दारू निर्मिती व विक्रीविरोधात गुन्हे शाखेची मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More