RSS मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी

– पुणे-मुंबईनंतर नागपुरातही खळबळ, दोन तासांची कसून झडती 

The Exposer
नागपूर : पुणे महापौर कार्यालयाला आलेल्या धमकीच्या ई-मेलमुळे महाराष्ट्रातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. पुणे महानगरपालिका कार्यालय, विधान भवन तसेच नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) मुख्यालयाला बॉम्बने उडवण्याची धमकी देण्यात आल्याने पोलिस आणि बॉम्ब शोधक पथकांनी तातडीने कारवाई सुरू केली.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे महापौर कार्यालयाच्या अधिकृत ई-मेलवर ‘तामिया एडवर्ड्स’ या नावाने धमकीचा संदेश पाठविण्यात आला होता. या ई-मेलमध्ये कथित आयईडी (IED) स्फोट घडवून आणण्याची धमकी देत संभाव्य वेळांचाही उल्लेख करण्यात आला होता. दरम्यान, मुंबई महापौर कार्यालयालाही अशाच प्रकारचा धमकीचा ई-मेल प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. त्या संदेशात महापौर कार्यालयासह अधिकृत वाहनालाही लक्ष्य करण्याचा इशारा देण्यात आला होता.
या धमकीची माहिती नागपुरात पोहोचताच शहर पोलिस यंत्रणा सतर्क झाली. पोलिस परिमंडळ-३ चे उपायुक्त राहुल मदने यांच्या मार्गदर्शनाखाली बॉम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि मोठ्या पोलिस बंदोबस्तासह महाल येथील संघ मुख्यालय तसेच रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात सखोल तपासणी मोहीम राबविण्यात आली.
सुमारे दोन तास चाललेल्या या सर्च ऑपरेशनमध्ये परिसरातील चप्प्या-चप्प्याची तपासणी करण्यात आली. मात्र, कोणतीही संशयास्पद वस्तू किंवा स्फोटक साहित्य आढळून आले नाही. गहन तपासणीनंतर बॉम्ब शोधक पथक आणि पोलिस अधिकाऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला.
दरम्यान, धमकीचा ई-मेल पाठविणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेल आणि इतर तपास यंत्रणा सक्रिय झाल्या असून, या प्रकरणामागील संभाव्य नेटवर्कचा शोध घेतला जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More