गुन्हे शाखा युनिट-५ची धडाकेबाज कारवाई, वाहनचोरांच्या टोळीचा पर्दाफाश

– १४ वाहने जप्त, पाच आरोपी ताब्यात, अल्पवयीनाचाही समावेश
– घरफोडीचे ७ गुन्हे उघडकीस, १२.६१ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक ५ ने वाहन चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करत पाच आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्या ताब्यातून १४ चोरीची वाहने तसेच घरफोडीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण १२ लाख ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ७ घरफोडीचे व १४ वाहनचोरीचे असे एकूण २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.
यशोधरानगर पोलीस ठाण्यात दाखल वाहन चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना गुन्हे शाखा युनिट-५ ला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून आकाश उर्फ भु-या निरफ परिहार (१९), शिवम सुखदेव जुनघरे (१९), आयुष उर्फ आल्या लहानू शेडे (१९), भूपन उर्फ ऑटो अशोक ठाकरे (२०) यांच्यासह एका विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपींनी नागपूर शहर व ग्रामीण भागातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत वाहन चोरी व घरफोडीचे गुन्हे केल्याची कबुली दिली. आरोपींकडून १४ दुचाकी वाहने (किंमत १०.३० लाख रुपये) आणि घरफोडीतील २.३१ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
घरफोडीच्या गुन्ह्यांमधून चोरी केलेले मोबाईल, लॅपटॉप, चांदीचे दागिने, सोन्याचे दागिने व इतर मौल्यवान वस्तू पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. आरोपींकडून चोरीच्या वाहनांची विक्री तसेच चोरीचा माल कमी किमतीत विकल्याचेही उघड झाले.
पोलीस तपासात यशोधरानगर, पोलीस ठाणे अजनी, बेलतरोडी, हुडकेश्वर, वाडी, कळमना तसेच नागपूर ग्रामीण भागातील अनेक गुन्ह्यांची उकल झाली आहे. उर्वरित चोरीच्या वाहनांबाबत व अन्य गुन्ह्यांबाबत तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) डॉ. दीपक अग्रवाल तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
प्रत्यक्ष कारवाई पोलीस निरीक्षक विनायक गोळे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. या मोहिमेत पोउपनि विशाल सांगोळे यांच्यासह पोलीस अंमलदार पुंडलिक शेळके, गजेन्द्र गोठे, चंद्रशेखर गौतम, प्रतीप भगत, अनीस खान, राजेंद्र टाकळीकर, रुपेश नानवटकर, गणेश ठाकरे, योगेश मलकार, प्रमोद बाणे, विशाल नागमिरे, रोशन लांडगेकर, दिलीप रिटस्कर, सुधीर तिवारी आणि आशीष पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More