– दुहेरी हत्याकांडाचा थरार उलगडला; गुन्हे शाखा युनिट-५ची धडाकेबाज कारवाई, तीन मुख्य आरोपी जेरबंद
The Exposer
नागपूर :, सक्करदरा परिसरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाने उपराजधानी हादरलेली असतानाच नागपूर गुन्हे शाखेच्या युनिट-५ ने अवघ्या काही तासांत कारवाई करत या खळबळजनक प्रकरणातील तीन मुख्य आरोपींना अटक केली आहे. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि शिताफीने राबविलेल्या शोधमोहीमेच्या जोरावर पोलिसांनी आरोपींचा माग काढत त्यांना जेरबंद केले.
सक्करदरा पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा क्रमांक २५५/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम १०३(१), ३(५) अन्वये हा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणात वैभव उर्फ दादू प्रदीप डोंगरे (३०), वेदांत उर्फ डब्बा अजय डोंगरे (२०) आणि अभिषेक उर्फ तात्या उत्तम राऊत (२६) यांना अटक करण्यात आली आहे.
कामावरून काढल्याचा राग; दुहेरी हत्येचा कट
पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, मृतक आदित्य उर्फ सोनू बोडवे याने काही दिवसांपूर्वी एका फळांच्या दुकानातील सुरक्षारक्षकाला कामावरून काढल्याने आरोपींमध्ये संताप निर्माण झाला होता. याच रागातून आरोपींनी मृतकासोबत वाद घालून सूड उगविण्याचा कट रचला.
१० जून रोजी रात्री आरोपींनी आदित्य उर्फ सोनू बोडवे आणि दादू उर्फ आदित्य राहूलकर यांना गाठून त्यांच्यावर विटा, दगड आणि धारदार शस्त्रांनी हल्ला केला. या भीषण हल्ल्यात दोघांचाही मृत्यू झाला. घटनेनंतर आरोपी फरार झाले होते. गुन्हे शाखेच्या युनिट-५ ला आरोपींबाबत गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पथकाने तांत्रिक विश्लेषण, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा माग काढला. अखेर सापळा रचून तिघांनाही ताब्यात घेण्यात आले.
उपराजधानीत वाढत्या खुनांमुळे चिंता
अवघ्या २४ तासांच्या कालावधीत शहरात घडलेल्या सलग खुनांच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. भरचौकात झालेल्या या दुहेरी हत्याकांडाने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.
या अधिकाऱ्यांनी उलगडला दुहेरी हत्याकांडाचा गुन्हा
ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र सिंघल, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (डिटेक्शन) दीपक अग्रवाल, सहायक पोलीस आयुक्त डॉ. अभिजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गोल्हे, पोलीस अंमलदार राजूसिंग राठोड, रुपेश मानवटकर, प्रमोद वावणे, मुकेश राजूत, योगेश महाजन, दीपक बावनकर, विवेक वानखेडे, आशिष पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच सायबर पोलीस अंमलदार विवेक झिंगरे व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपासात विशेष सहकार्य केले.
नागपूर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी
दुहेरी हत्याकांडासारख्या गंभीर गुन्ह्याचा काही तासांत छडा लावून आरोपींना जेरबंद करण्यात नागपूर गुन्हे शाखेला यश आले आहे. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली असून, गुन्हेगारांना कायद्याचा धाक कायम असल्याचा संदेशही गेला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











