– ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी व विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात; आणखी एक आरोपी फरार
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट-३ पथकाला यश आले आहे. पोलिसांनी एका सराईत आरोपीसह एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत ८२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणातील आणखी एक आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शांतीनगर पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अप.क्र. 118/2026 व 122/2026 या घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करताना आरोपी निकेश रितेश लिंगायत (वय 19, रा. बाबा बुद्ध नगर, गल्ली क्र. 3, पाचपावली) आणि एका विधी संघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्यांनी दोन्ही गुन्ह्यांची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपींकडून चोरीस गेलेले 5.300 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र (किंमत 70 हजार रुपये) तसेच तीन मॉनिटर (किंमत 12 हजार रुपये) असा एकूण 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या गुन्ह्यातील सलमान (रा. ताजनगर टेका, अजित किराणा स्टोअरजवळ, पाचपावली) हा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक रवाना करण्यात आले आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींची वैद्यकीय तपासणी करून पुढील कारवाईसाठी त्यांना आणि जप्त मुद्देमालाला शांतीनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हे शाखा युनिट-३च्या या कारवाईमुळे घरफोडीच्या दोन गुन्ह्यांचा छडा लागला असून परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. पोलिसांनी फरार आरोपीला लवकरच अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











