ईडी चौकशीची मागणी! ७८० ठेवीदारांचे २४.६९ कोटी अडकले; मेडिकलच्या पतसंस्थेत नेमके काय घडले?

– १.२७ अब्ज उलाढालीचा दावा फोल ठरला? पैसे मागितल्यावर ठेवीदारांवरच पोलिस तक्रारींचा बडगा

The Exposer
नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (GMC) व सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलशी संबंधित दि मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल एम्प्लॉईज क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, नागपूर या पतसंस्थेतील आर्थिक संकटाने आता गंभीर वळण घेतले असून, संतप्त ठेवीदारांनी थेट सक्तवसुली संचालनालय (ED) चौकशीची मागणी केली आहे.
सध्या संस्थेतील ७८० ठेवीदारांचे तब्बल २४ कोटी ६९ लाख ४१ हजार ४१६ रुपये मुदतपूर्ती होऊनही वर्षभरापासून अडकून पडले आहेत. त्यामुळे निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, मुलांच्या शिक्षणासाठी व लग्नासाठी बचत करणारे सभासद मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
ठेवीदारांच्या म्हणण्यानुसार, एकेकाळी १ अब्ज २७ कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असल्याचा दावा करणारी संस्था आज स्वतःच्या सभासदांना पैसे परत देऊ शकत नसल्याने तिच्या आर्थिक कारभारावर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

पैसे मागितले तर पोलिस तक्रारी

धक्कादायक बाब म्हणजे, आपल्या ठेवींची विचारणा करण्यासाठी कार्यालयात जाणाऱ्या सभासदांविरोधातच पोलिसांकडे तक्रारी करण्यात आल्याचा आरोप ठेवीदारांनी केला आहे. पतसंस्थेने काही सभासद कामकाजात अडथळे आणतात, कर्मचाऱ्यांना धमकावतात आणि गोंधळ घालतात, असा आरोप केला आहे. मात्र ठेवीदारांचा सवाल सरळ आहे –”आमचेच पैसे अडकले आहेत. मग आम्ही प्रश्न विचारायचे कुणाला?”

कर्जहप्ते कपात बंद; संकटाची सुरुवात?

मेडिकल कॉलेज प्रशासनाने कर्मचाऱ्यांच्या वेतनातून कर्जहप्त्यांची कपात थांबवल्यानंतर संस्थेच्या रोख प्रवाहावर परिणाम झाल्याचे सांगितले जाते. मात्र ठेवीदारांच्या मते, संकटाची कारणे केवळ एवढीच नसून त्यामागे अनेक आर्थिक निर्णय दडलेले आहेत.

माजी संचालकांच्या निर्णयांमुळेच आजची अवस्था?

पीडित ठेवीदारांचा आरोप आहे की, काही वर्षांपूर्वी संस्थेच्या संचालक मंडळाने सभासदांच्या कोट्यवधी रुपयांच्या ठेवी मोठ्या प्रकल्पांमध्ये गुंतवल्या. त्या गुंतवणुकीत योग्य आर्थिक नियोजन झाले की नाही, हा आजचा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. काही निर्णय वैयक्तिक हितसंबंध, कमिशनखोरी किंवा विशिष्ट व्यक्तींना लाभ मिळावा यासाठी घेण्यात आले का, याची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More