– संशयास्पद नामांतरणावर आक्षेप, एफआयआरची मागणी
The Exposer
नागपूर : कटोल रोड परिसरातील मौजा बोरीगाव येथील सिटी सर्व्हे क्रमांक ५४२ आणि खासरा क्रमांक १५६ मधील सरकारी जमिनीवर कथितरीत्या कब्जा करण्याचा प्रयत्न होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते ज्वाला धोटे यांनी पत्रकार परिषदेत हा आरोप करत संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
धोटे यांनी दावा केला की, हनुमान मंदिर, सार्वजनिक खुली जागा, विहीर आणि वृक्ष असलेल्या या सरकारी जमिनीची नोंद काही खासगी व्यक्ती व एका बँकेच्या नावावर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी संशयास्पद दस्तऐवजांचा वापर करून नामांतरण प्रक्रिया राबविण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
त्यांच्या म्हणण्यानुसार, महसूल नियमांनुसार सर्व्हेपूर्वी संबंधित धारक व परिसरातील हितधारकांना नोटीस देणे आवश्यक असताना त्याचे पालन करण्यात आले नाही. १९ मे २०२६ रोजी प्रस्तावित सुनावणीची माहिती मंदिर व्यवस्थापनाशी संबंधित घटकांनाही देण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात आला.
जिल्हा प्रशासन व नजूल विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सदर जमीन कोणालाही लीजवर देण्यात आलेली नसल्याचा दावा धोटे यांनी केला. त्यामुळे सरकारी मालमत्तेवर खासगी हक्क प्रस्थापित करण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय अधिक बळावल्याचे त्यांनी सांगितले.
धोटे यांनी प्रशासनाकडे कथित अवैध नोंदी रद्द करून जमीन शासनाच्या नावावर कायम ठेवण्याची, संबंधितांवर एफआयआर दाखल करण्याची आणि भविष्यातील सर्व्हे प्रक्रिया थांबविण्याची मागणी केली आहे. आवश्यकता भासल्यास न्यायालयीन लढा उभारण्याचा इशाराही त्यांनी नुकत्याच घेलेल्या पत्रकार परिषदेतून दिला. दुसरीकडे या भूखंड आणि धार्मिक स्थळाच्या वादातून आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडत आहॆ. तर याच प्रकरणातून माजी नगरसेवक माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशीविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला, हे विशेष.
Author: संतोष तायडे
संपादक











