– सराईत आरोपी जेरबंद, चोरीचा ऐवज हस्तगत
– तांत्रिक तपासाच्या आधारे आरोपीला बेड्या

The Exposer
नागपूर : भांडेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राणी सती नगर परिसरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा अवघ्या काही दिवसांत छडा लावत पोलिसांनी दोघा सराईत आरोपीना अटक केली आहे. आरोपीकडून रोख रक्कम, सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण सुमारे ₹ 94,220 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी लक्ष्मी सचिन भजनकर (वय 30) या आपल्या घराला कुलूप लावून बाहेर गेल्या असताना अज्ञात चोरट्याच्या टोळीने घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने चोरी करून आरोपी फरार झाला. याप्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
गुन्ह्याचा तपास सुरू असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चरडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी रोहित अशोक भगत (वय 20) रा. प्लॉट नंबर 733, जयभीम नगर, अजनी पीएस, याला नागपुरातून ताब्यात घेतले. तर त्याचा साथीदार इरफान शमशाद अन्सारी रा. अंबे नगर, लाल शाळेजवळ, भांडेवाडी, याला पोलिसांनी झारखंड येथील चतरा येथून ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान दोघांनी संगणमत करून घरफोडी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीकडून रोख रक्कम, एक चांदीची अंगठी, चांदीची वाटी-चमचा आणि चांदीचे पैंजण असा चोरीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे दोन्ही आरोपी हे यापूर्वीही चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असल्याचे तपासात समोर आले असून त्यांच्याविरुद्ध पूर्वीचे गुन्हेही दाखल आहेत.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चरडे, महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी मॅडम, पोउपनिरीक्षक दीपक चालुरकर, पोलिस हवालदार अश्विन बडगे, पंकज लांडगे, सुनील वानखेडे, मिलिंद ठाकरे, पोलिस हवालदार (वाहन चालक) मनोहर झलके, डिसिपी झोन 5 च्या सायबर सेलचे अंमलदार प्रवीण इवनाते, आशिष पिपरेटे, तसेच गुन्हे शोध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.
Author: संतोष तायडे
संपादक











