– छिंदवाड्यात लपून बसलेल्या आरोपीला अटक; अय्याज मदार व अमीन शेख यांच्या पोलिस कोठडीत वाढ
The Exposer
नागपूर : कथित धर्मांतरण आणि लैंगिक शोषण प्रकरणात सोनेगाव पोलिसांना मोठे यश मिळाले असून, या प्रकरणातील फरार असलेला हजरत मौलवी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात लपून बसलेल्या मौलवीला बुधवारी उशिरा रात्री अटक करण्यात आली. त्यामुळे या गाजलेल्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी तिघेही आता पोलिसांच्या ताब्यात आले आहेत.
पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या माहितीच्या आधारे तपास पथकाने मध्य प्रदेशातील तामिया परिसरात शोधमोहीम राबविली होती. याच ठिकाणी महिलेवर कथितरित्या धर्मांतरणासाठी दबाव टाकण्यात आल्याचा आरोप आहे. सुरुवातीच्या कारवाईदरम्यान मौलवी पोलिसांच्या हाती लागला नव्हता. मात्र सततच्या पाठलागानंतर आणि गुप्त माहितीच्या आधारे सोनेगाव पोलिसांनी अखेर त्याला अटक करण्यात यश मिळविले.
या प्रकरणात यापूर्वीच कळमेश्वर येथील अय्याज ताज मदार (वय २६) आणि अमीन शेख (वय ३०) यांना अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत आणखी पाच दिवसांची वाढ केली आहे.
तपासादरम्यान धर्मांतरणासाठी कथित दबाव, लैंगिक शोषण, आर्थिक व्यवहार आणि या रॅकेटशी संबंधित इतर व्यक्तींचा सहभाग याबाबत पोलिस सखोल चौकशी करत आहेत. नव्याने अटक करण्यात आलेल्या मौलवीकडून या प्रकरणातील अनेक महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या संवेदनशील प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून, संपूर्ण घटनाक्रमाचा तपास सोनेगाव पोलीस कसून करीत आहेत. येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून वर्तविण्यात येत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











