‘पोलिसांचा खबरी’ असल्याच्या संशयातून रम्यूची हत्या!

– तिघे अटकेत, चोरीच्या मालाच्या हिस्से वाटपावरून वाद
– लकडगंज हद्दीतील रेल्वे मालधक्का परिसरातील घटना 

The Exposer
नागपूर : इतवारी रेल्वे स्थानकाजवळील मालधक्का परिसरात एका सराईत गुन्हेगाराची चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. अब्दुल रहीम उर्फ रम्यू अब्दुल रज्जाक (वय 38, रा. शांतीनगर) असे मृतकाचे नाव असून, या प्रकरणी लकडगंज पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून परशेवर उर्फ ईश्वर उर्फ पेलू उर्फ पप्पू संतोष पटेल याच्यासह तिघांना अटक केली आहे. तर इतर फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतक व आरोपी हे एकाच परिसरातील रहिवासी असून त्यांच्यावर चोरी, दरोडे व लुटमारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. काही गुन्ह्यांमध्ये ते एकत्र सहभागी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. चोरीच्या मालाच्या वाटपावरून त्यांच्यात पूर्वी वाद झाला होता. त्यानंतर अब्दुल आरोपींपासून वेगळा राहत होता.

दरम्यान, आरोपींना अब्दुल हा पोलिसांना माहिती पुरवतो, त्यांच्या गुन्हेगारी हालचालींची खबर देतो असा संशय होता. त्यामुळे त्यांच्यातील वैर अधिकच तीव्र झाले होते. घटनेच्या एक दिवस आधी अब्दुलने आरोपींपैकी एकाच्या घरी जाऊन गोंधळ घातल्याची व कुटुंबीयांना धमकावल्याची माहितीही समोर आली आहे.

याच रागातून रविवारी मध्यरात्री आरोपींनी अब्दुलला मालधक्का परिसरातील निर्जन ठिकाणी गाठले. त्यानंतर चाकूने सपासप वार करत त्याची अत्यंत क्रूरपणे हत्या केली. सोमवारी पहाटे फिरायला गेलेल्या नागरिकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानंतर लकडगंज पोलिस घटनास्थळी दाखल झाले.

50 ते 60 जणांची चौकशी; ‘सिम्बा ॲप’मुळे पटली ओळख

सुरुवातीला मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी पोलिसांनी परिसरातील सुमारे 50 ते 60 मजूर व नागरिकांची चौकशी केली. मात्र कोणालाही मृताची ओळख पटली नाही. त्यानंतर गुन्हेगारांची माहिती जतन करणाऱ्या ‘सिम्बा ॲप’ मध्ये मृताचा फोटो अपलोड करण्यात आला. त्यातून त्याची ओळख निश्चित झाली आणि पोलिसांनी कुटुंबीयांशी संपर्क साधला.

कुटुंबीयांनी व्यक्त केला संशय; गुन्हे शाखेची झडती कारवाई

मृताच्या कुटुंबीयांनी काही संशयितांची नावे पोलिसांना दिल्यानंतर गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक 3 ने तातडीने तपास सुरू केला. यामध्ये परशेवर उर्फ ईश्वर उर्फ पेलू उर्फ पप्पू संतोष पटेल याच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली. दोन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे.

कलमना येथील चोरीच्या प्रकरणातून वाढला संशय

काही दिवसांपूर्वी कलमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या चोरीच्या प्रकरणात आरोपींना अटक झाली होती. त्या कारवाईमागे अब्दुलने पोलिसांना माहिती दिली असल्याचा आरोपींना संशय होता. याच संशयातून अखेर वैराचे रूपांतर रक्तरंजित हत्येत झाल्याचे प्राथमिक तपासातून समोर येत आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More