– गुन्हे शाखा युनिट- 1 च्या पोलिस पथकाने 36 तासांत आरोपीला ठोकल्या बेड्या तांत्रिक तपासासह अथक परिश्रमांना यश
The Exposer
नागपूर : एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोन चौक परिसरात घडलेल्या हत्या प्रकरणाचा छडा लावत गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या पोलिस पथकाने अवघ्या 36 तासांत आरोपीला अटक करण्यात यश मिळविले. घटनास्थळावरील प्रत्यक्ष चौकशी, नागरिकांकडून मिळालेली माहिती, सीसीटीव्ही व इतर तांत्रिक पुराव्यांचा प्रभावी वापर करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या.
जितेंद्र उर्फ पप्पू बारेलाल तांडेकर (वय 32) असे हत्या झालेल्या युवकांचे नाव आहॆ. फिर्यादी दिनेश बारेलाल दांडेकर (वय 40, रा. राजीव नगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव सुमित रवींद्रकुमार शुक्ला (वय 32) असून तो मूळचा शेखापूर, सराय भारत, ता. सोराव, जि. प्रयागराज (उत्तर प्रदेश) येथील रहिवासी आहे.
दारूच्या नशेत वाद अन् निर्घृण हल्ला
पोलिस तपासानुसार, 27 जूनच्या रात्री मृतक जितेंद्र उर्फ पप्पू हा दारूच्या नशेत झोन चौकातील ठाकरे टी स्टॉलजवळ झोपला होता. त्याचवेळी आरोपी सुमित शुक्ला तेथे आला आणि मोठ्याने बडबड करू लागला. आरोपीदेखील मद्यधुंद अवस्थेत असल्याने दोघांमध्ये वाद झाला. वाद वाढताच मृतकाने आरोपीला अश्लील शिवीगाळ केल्याने संतप्त झालेल्या आरोपीने जवळच पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून मृतकाच्या डोक्यावर व शरीरावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या जितेंद्रचा घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला.
तांत्रिक तपासामुळे आरोपी जेरबंद
घटनेनंतर एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळावरील नागरिकांची चौकशी, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपीची ओळख निश्चित केली. त्यानंतर पोलिस पथकाने अत्यंत शिताफीने कारवाई करत आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपीने गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस निरीक्षक प्रशांत ठवरे यांच्या मार्गदर्शनाखाली API सचिन भोंडे, API राजाभाऊ जाधव, ASI विनोद देशमुख, HC नितीन वासनिक, हेमंत लोणारे, मनोज टेकाम, प्रीतम यादव, सुशांत सोळंके, सुनीत गुजर, रितेश तुमडाम, शरद चांभारे, PC स्वप्निल खोडके, कुणाल गेडाम तसेच चालक नितीन बोपुलकर, अजमत शेख आणि रवींद्र खेडेकर यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन यशस्वीपणे पार पाडली. अवघ्या 36 तासांत गंभीर हत्येचा गुन्हा उघडकीस आणत आरोपीला अटक करण्यात यश मिळाल्याने एमआयडीसी पोलिसांच्या तांत्रिक तपास आणि जलद कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











