हुक्का पार्लरवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’! हॉटेल हेरिटेजवर मध्यरात्री धाड; ४५ तरुण-तरुणी ताब्यात, ३.५७ लाखांचा मुद्देमाल जप्त

– नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांचा अवैध धंद्यांना पहिलाच दणका; हॉटेल मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा

The Exposer
नागपूर : शहरातील बेकायदेशीर हुक्का पार्लरवर नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत सिव्हिल लाइन्स परिसरातील हॉटेल हेरिटेज येथे मध्यरात्री धाड टाकली. या कारवाईत हुक्का सेवन करताना आढळलेल्या ४५ तरुण-तरुणींना पोलिसांनी ताब्यात घेतले, तर ३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी हॉटेलचे मालक व व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नागपूरचे नवे पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील अवैध धंद्यांविरोधात कठोर भूमिका घेतली असून, त्याचाच भाग म्हणून गुन्हे शाखेचे डीसीपी दीपक अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस पथकाने ही नियोजनबद्ध धाड टाकली.

पोलिसांनी कारवाईदरम्यान हुक्का पार्लरमधून विविध प्रकारचे हुक्के, फ्लेवर, कोळसा तसेच इतर साहित्य जप्त केले. छाप्यावेळी मोठ्या संख्येने तरुण-तरुणी हुक्का सेवन करत असल्याचे आढळून आले. त्यानंतर सर्वांना ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली.

शहरातील बजाजनगर, सीताबर्डी, एमआयडीसी, अंबाझरी आणि सदर परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर हुक्का पार्लर सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. या पार्लरवर कारवाई टाळली जात असल्याच्या चर्चाही शहरात रंगल्या होत्या. मात्र, नव्या पोलिस नेतृत्वाखाली आता अशा अवैध व्यवसायांविरोधात निर्णायक कारवाई सुरू झाल्याचे या धाडीतून स्पष्ट झाले आहे.

कारवाईदरम्यान काही प्रभावशाली व्यक्तींनी दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा असली, तरी पोलिसांनी कोणताही दबाव न स्वीकारता कारवाई पूर्ण केली. यापूर्वीही हॉटेल हेरिटेजमध्ये अवैध हुक्का पार्लर सुरू असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. यावेळी मात्र पोलिसांनी अचूक नियोजन करून संपूर्ण प्रकार उघडकीस आणला.

पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी शहरातील हुक्का पार्लर, अमली पदार्थांची तस्करी आणि इतर बेकायदेशीर धंद्यांविरोधातील मोहीम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. तसेच छाप्याची माहिती आधीच संबंधितांपर्यंत पोहोचविणाऱ्यांचाही शोध सुरू असल्याची चर्चा असून, अशा व्यक्तींवरही कारवाईची टांगती तलवार असल्याचे बोलले जात आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More