– उच्चस्तरीय चौकशी करा, मुख्यमंत्री व परिवहन मंत्र्यांना निवेदन
– राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या (अजित पवार) नेत्या नूतन रेवतकर यांची मागणी
The Exposer
नागपूर : आरटीओ विभागातील कथित गंभीर गैरव्यवहार, भ्रष्टाचाराशी संबंधित प्रकरणांमधील तपासावर प्रभाव टाकण्याचे प्रयत्न तसेच माध्यमांचा वापर करून विभागाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रकार रोखण्यासाठी संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) च्या नेत्या नूतन रेवतकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, अलीकडे व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपच्या पार्श्वभूमीवर आरटीओ विभागाबाबत विविध आरोप-प्रत्यारोप होत असून, यामुळे विभागाची प्रतिमा सुधारण्याऐवजी गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. भ्रष्टाचाराविरोधातील कारवाईला जनतेचा पाठिंबा असला तरी तपास यंत्रणांवर दबाव निर्माण होईल किंवा आरोपींना अप्रत्यक्ष मदत होईल, अशा कोणत्याही प्रकारच्या हस्तक्षेपाला आळा घालणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

नूतन रेवतकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील एका वादग्रस्त प्रकरणाचा उल्लेख करत, त्यातील काही बाबी वस्तुस्थितीशी विसंगत असल्याचा संशय व्यक्त केला आहे. विभागातील अंतर्गत गटबाजी, वैयक्तिक स्वार्थ किंवा माध्यमांचा वापर करून अधिकाऱ्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न झाला असल्यास त्याचीही सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
निवेदनात संबंधित प्रकरणांमध्ये कोणत्याही व्यक्तीला किंवा अधिकाऱ्याला राजकीय अथवा प्रशासकीय संरक्षण मिळत असल्यास त्याचाही तपास करण्याची आवश्यकता अधोरेखित करण्यात आली आहे. तसेच दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम तसेच लागू असलेल्या शिस्तभंग नियमांनुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
याशिवाय, आरटीओ विभागात पारदर्शक, उत्तरदायी आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासनासाठी आवश्यक सुधारणा तातडीने राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. या निवेदनाची प्रत पोलिस महासंचालक, अँटी करप्शन ब्युरो (एसीबी) तसेच परिवहन आयुक्तांनाही माहिती व आवश्यक कार्यवाहीसाठी पाठविण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











