– नागपूर जिल्हा व न्यायालयाचा कठोर दणका
The Exposer
नागपूर : लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असलेल्या प्रेयसीची अत्यंत क्रूरपणे हत्या करणाऱ्या आरोपीला नागपूर जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावत कठोर संदेश दिला आहे. मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी आरोपी जाहीद खान याकूब खान (वय ४०, रा. श्रद्धानंदपेठ) याला आजीवन कारावासाची शिक्षा ठोठावत ५०० रुपयांचा दंडही सुनावला. दंडाची रक्कम न भरल्यास त्याला अतिरिक्त तीन महिन्यांचा कारावास भोगावा लागणार आहे.
ही थरकाप उडवणारी घटना १ जून २०२२ रोजी मध्यरात्री श्रद्धानंदपेठ परिसरात घडली होती. जाहीद खान आणि प्रिया घोडेस्वार (वय ४०) हे दोघे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. घटनेच्या रात्री दोघांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापाच्या भरात जाहीद खानने घरातील लोखंडी तवा उचलून प्रियाच्या डोक्यावर जोरदार वार केले.
या अमानुष हल्ल्यात प्रिया गंभीर जखमी झाली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचार सुरू असतानाच ४ जून २०२२ रोजी तिचा मृत्यू झाला. त्यानंतर बजाजनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.
तपास पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले. सुनावणीदरम्यान सादर करण्यात आलेले भक्कम पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने जाहीद खान याला खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
या खटल्यात सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील ॲड. आसावरी पळसोदकर यांनी प्रभावीपणे बाजू मांडत आरोपीविरुद्ध युक्तिवाद केला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे महिलांविरुद्धच्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कायदा कठोर कारवाई करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा स्पष्ट संदेश समाजात गेला आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











