– अवघ्या सहा महिन्यांत 15 गुन्हे उघड; ₹3 कोटी 83 लाख 36 हजार 50 रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त; MCOCA व MPDA अंतर्गतही कठोर कारवाई
The Exposer
नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात राबविलेल्या विशेष मोहिमेत 2026 च्या पहिल्या सहा महिन्यांत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. जानेवारी ते जून 2026 या कालावधीत NDPS कायद्यांतर्गत 15 गुन्हे उघडकीस आणत ₹3 कोटी 83 लाख 36 हजार 50 रुपये किमतीचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, ही जप्ती 2025 मधील संपूर्ण वर्षभरातील जप्तीपेक्षा तब्बल 1,052 टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती नागपूर ग्रामीण पोलिसांनी दिली.
ही संपूर्ण कारवाई नागपूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या मोहिमेदरम्यान पोलिसांनी 810 किलो गांजा, 34 किलो अफू (Opium) आणि 639 ग्रॅम एमडी (MD) जप्त केली. तसेच, मागील वर्षाच्या तुलनेत गांजा जप्तीत 643 टक्के, अफू जप्तीत 587 टक्के आणि एमडी जप्तीत तब्बल 1,873 टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे.
अमली पदार्थांच्या अवैध व्यापारात सहभागी असलेल्या सराईत गुन्हेगारांविरोधातही नागपूर ग्रामीण पोलिसांनी कठोर कारवाईचा बडगा उगारला आहे. 4 टोळ्यांतील 12 आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्यात आली असून, समाजासाठी धोकादायक ठरणाऱ्या 3 गुन्हेगारांवर महाराष्ट्र प्रतिबंधक धोकादायक क्रियाकलाप अधिनियम (MPDA) अंतर्गत प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अमली पदार्थांच्या अवैध तस्करीविरोधात नागपूर ग्रामीण पोलिसांनी सुरू केलेल्या या धडक मोहिमेमुळे जिल्ह्यातील अमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आळा बसण्यास मदत झाली आहे. गुन्हेगारांविरोधातील कठोर धोरण कायम ठेवत आगामी काळातही अशाच प्रभावी आणि सातत्यपूर्ण कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











