– जिल्ह्यातील 23 पोलिस ठाण्यांत एकाचवेळी धडक कारवाई; गुन्हेगारांना कायद्याचा कडक इशारा
The Exposer
नागपूर : नागपूर ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगारांविरोधात मोठी आणि आक्रमक मोहीम राबवत 751 रेकॉर्डवरील आरोपींची आरोपी परेड घेत गुन्हेगारी विश्वात खळबळ उडवून दिली. गंभीर गुन्हे, मालमत्तेविषयक गुन्हे, महिला व बालकांवरील अत्याचार, अवैध दारू, जुगार तसेच इतर बेकायदेशीर धंद्यांमध्ये सहभागी असलेल्या रेकॉर्डवरील आरोपींना संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये हजर राहण्यास सांगून त्यांची पडताळणी करण्यात आली.

ही विशेष मोहीम पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि अपर पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आली. जिल्ह्यातील 23 पोलिस ठाण्यांमध्ये एकाचवेळी आरोपी परेड घेऊन गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
उपविभागनिहाय आरोपी परेड
नागपूर उपविभाग – 95 आरोपी
उमरेड उपविभाग – 140 आरोपी
सावनेर उपविभाग – 140 आरोपी
कन्हान उपविभाग – 70 आरोपी
रामटेक उपविभाग – 125 आरोपी
काटोल उपविभाग – 181 आरोपी
एकूण – 751 रेकॉर्डवरील आरोपींची पडताळणी करण्यात आली.
या मोहिमेदरम्यान पोलिसांनी प्रत्येक आरोपीची उपस्थिती, हालचाली व सध्याची माहिती तपासली. भविष्यात कायदा व सुव्यवस्था बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगारांवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येणार असून, गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी अशा विशेष मोहिमा नियमितपणे राबविल्या जाणार असल्याचे पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले.
गुन्हेगारांना स्पष्ट संदेश देत नागपूर ग्रामीण पोलिसांनी कायद्याचा धाक कायम ठेवण्यासाठी ही मोहीम प्रभावीपणे राबविल्याने जिल्ह्यातील गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण मिळविण्यास मोठी मदत होणार असल्याचे मानले जात आहे.
Author: संतोष तायडे
संपादक











