11 दिवसांनंतर परसवानी कुटुंबाचा लागला सुगावा! एका G-Pay व्यवहाराने उलगडले रहस्य

– नागपूर पोलिसांचे पथक पुण्यात दाखल, शोध मोहिमेची वाढवली गती 

The Exposer
नागपूर : धंतोली परिसरातील बलराज मार्गावरील पॉश भागातून 11 दिवसांपूर्वी रहस्यमयरीत्या बेपत्ता झालेल्या परसवानी कुटुंबाचा अखेर नागपूर पोलिसांना महत्त्वाचा सुगावा लागला आहे. अनेक दिवस मोबाईल फोन बंद असल्याने आणि कोणताही ठोस धागादोरा हाती लागत नसल्याने तपास अडकला होता. मात्र, G-Pay वरील एका ऑनलाइन व्यवहाराने संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले.

या डिजिटल व्यवहारातून कुटुंबाचे लोकेशन पिंपरी-चिंचवड येथे असल्याचे समोर आल्यानंतर नागपूर पोलिसांचे विशेष पथक त्यांचा शोध घेण्यासाठी पुण्यात दाखल झाले आहे.

धंतोलीतील बलराज मार्गावरील दुर्गा सदन येथे राहणारे जितेंद्र परसवानी, त्यांची आई हर्षा, पत्नी इशिता, मुलगी खुशी आणि मुलगा कृष्णा हे 24 जूनपासून अचानक बेपत्ता झाले होते. कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन सतत बंद असल्याने पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान उभे राहिले होते.

तपासादरम्यान पोलिसांना धक्कादायक माहिती मिळाली की, हे कुटुंब इंटरनेट फक्त ऑनलाइन पेमेंट करतानाच काही सेकंदांसाठी सुरू करत होते. त्याचवेळी पिंपरी-चिंचवड येथे करण्यात आलेल्या G-Pay व्यवहारातून त्यांचे डिजिटल लोकेशन पोलिसांच्या हाती लागले आणि तपासाला निर्णायक दिशा मिळाली.

आर्थिक संकटामुळे नागपूर सोडल्याचा प्राथमिक अंदाज

पोलिस तपासात परसवानी कुटुंब गेल्या काही काळापासून गंभीर आर्थिक अडचणीत असल्याचेही समोर आले आहे. जितेंद्र परसवानी हे कर्ज फेडण्यासाठी त्यांच्या वाट्याची मालमत्ता विकण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, मालमत्तेतील हिस्सेदारी आणि कायदेशीर अडचणींमुळे व्यवहार पूर्ण होऊ शकला नाही.

याच आर्थिक तणावातून त्यांनी नागपूर सोडण्याचा निर्णय घेतल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. तपासादरम्यान नातेवाईकांकडूनही अपेक्षित माहिती मिळाली नाही. कुटुंबाचा इतर नातेवाईकांशी अनेक वर्षांपासून मर्यादित संपर्क असल्याने सुरुवातीच्या तपासात पोलिसांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. त्यात ऑनलाईन पेमेंटसाठी मोबाईल कोण हाताळत आहॆ, याबाबतही गूढ कायम आहॆ.

सध्या नागपूर पोलिसांचे विशेष पथक पुणे परिसरात परसवानी कुटुंबाचा शोध घेत असून, ते सुरक्षित असल्याची खात्री करून त्यांच्या अचानक बेपत्ता होण्यामागील नेमके कारण तपासातून स्पष्ट होणार आहे. त्यात या कुटुंबाचा पैशासाठी खरच छळ करण्यात आला का, आला तर छळ करणारे कोण? असे विविध प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे पोलिस सर्व दिशेने तपास करीत असल्याची चर्चा आहॆ.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More