धर्मगुरूंचा भररस्त्यात अपमान; दोन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल

– आंबेडकर कॉलेजजवळ शिवीगाळ, हात पकडून ओढण्याचा प्रयत्न; व्हिडीओ व्हायरल करण्यासह जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप

The Exposer
नागपूर : धर्मगुरू म्हणून समाजात कार्यरत असलेल्या ६५ वर्षीय महिलेचा भररस्त्यात अपमान करून त्यांच्याशी गैरवर्तन केल्याची गंभीर घटना बजाजनगर परिसरातील डॉ. आंबेडकर कॉलेजजवळ घडली. पीडित धर्मगुरूंच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी माया उके आणि मंगला उडके या दोन महिलांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार, पीडित महिला गेल्या अनेक वर्षांपासून धर्मगुरू म्हणून कार्यरत असून दररोज वंदना करण्यासाठी धार्मिक स्थळी जातात. १० जुलै रोजी सकाळी त्या धार्मिक स्थळी गेल्या होत्या. वंदना सुरू असताना दोन महिलांनी त्यांच्याजवळ येऊन त्यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत वाद घालण्यास सुरुवात केली. यावेळी अपमानास्पद शब्दांचा वापर करून त्यांना सार्वजनिक ठिकाणी कमी लेखण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

वाद वाढल्यानंतर पीडित धर्मगुरू तेथून निघून डॉ. आंबेडकर कॉलेज परिसरात गेल्या. मात्र, संबंधित महिलांनी त्यांचा पाठलाग केल्याचा आरोप आहे. कॉलेज परिसरातील एका कॅबिनजवळ पीडितेला प्रवेश नाकारण्यात आल्यानंतर त्यांनी बाहेर थांबून संबंधितांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. याचदरम्यान आरोपी महिलांनी पुन्हा वाद घालत पीडितेच्या हाताला धरून ओढण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

पीडितेने विरोध केला असता त्यांना धमकावण्यात आले. तसेच, संपूर्ण घटनेचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून ते सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे आपला सामाजिक सन्मान दुखावला असून मानसिक त्रास झाल्याचे पीडित धर्मगुरूंनी तक्रारीत म्हटले आहे.

घटनेनंतरही आरोपींकडून अपमानास्पद वक्तव्ये आणि धमक्या सुरू असल्याचा आरोप पीडितेने केला. त्यामुळे त्यांनी बजाजनगर पोलिस ठाण्यात धाव घेत कठोर कारवाईची मागणी केली. तक्रारीच्या आधारे बजाजनगर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४, ७६, २९६, ३५१(२), ३५२ आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस निरीक्षक शिवाजी नारायण बोरकर करीत आहेत.

धर्मगुरूंच्या सन्मानाला धक्का देणाऱ्या घटनेने संताप

धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या ज्येष्ठ महिलेचा सार्वजनिक ठिकाणी अपमान करून हात पकडण्याचा प्रयत्न तसेच सोशल मीडियाच्या माध्यमातून बदनामी केल्याच्या आरोपामुळे या प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले आहे. आरोपींविरुद्ध आयटीचे कलम लावून कठोर कारवाई करावी, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता आणि घटनाक्रमाचा पुढील तपास बजाजनगर पोलिस करीत आहेत.

आरोपी महिलांचा काढणार मोबाईल सिडिआर 

आरोपी दोन्ही महिला कुणाच्या ईशाऱ्यावरून घटनास्थळी आल्या होत्या का? आणि त्यांना कशाकरिता ‘हायर’ करण्यात आले. त्यांच्या संपर्कात कोण होते. नामांकित डॉ. आंबेडकर कॉलेज परिसरात त्यांनी अनधिकृतरित्या प्रवेश केला का आणि कसा केला. या दिशेने सुध्दा बजाजनगर पोलिस तपास करीत आहेत. यासाठी या दोन्ही आरोपी महिलांचे मोबाईल सिडीआर काढण्यात येणार आहॆ. त्यांचा पूर्वीचा पोलिस रेकॉर्ड आहॆ का? तसेच घटनेच्या दरम्यान त्यांच्या संपर्कातील व्यक्तीं कोण आणि ते का संपर्कात होते. आदी बाबींची सुध्दा पोलिसांकडून चौकशी होणार असल्याची चर्चा आहॆ. 

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More