नोकरीच्या आमिषाला ‘तांत्रिक पूजे’चे जाळे; अंधश्रद्धेच्या आड महिलेवर अत्याचार!

– मुलाला माथाडीमध्ये नोकरी लावण्याचे आश्वासन देत कुटुंबाचा विश्वास संपादन; पूजेच्या बहाण्याने पती-पुत्राला घराबाहेर पाठवून दुष्कर्म केल्याचा आरोप

– नरबळी-जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वयेही गुन्हा; १५ दिवसांनंतर पीडितेने मौन सोडले, सुरक्षा रक्षकाला अटक

The Exposer
नागपूर : मुलाला माथाडीमध्ये नोकरी मिळावी, या कुटुंबाच्या अपेक्षेचा गैरफायदा घेत कथित तांत्रिक पूजा आणि अंधश्रद्धेचे जाळे विणून एका महिलेवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत उघडकीस आली आहे. आरोपीने स्वतःला माथाडी कामगार असल्याचे भासवून प्रथम कुटुंबाचा विश्वास संपादन केला. त्यानंतर मुलाला नोकरी मिळण्यासाठी “विशेष पूजा” करावी लागेल, असे सांगत कथित धार्मिक विधीचा बनाव रचला आणि पती व मुलाला पूजेचे साहित्य आणण्याच्या बहाण्याने घराबाहेर पाठवून महिलेवर दुष्कर्म केल्याचा आरोप आहे.

धार्मिक श्रद्धा आणि तांत्रिक पूजेचा कथित आधार घेत कुटुंबाच्या विश्वासाचा गैरफायदा घेण्याचा हा प्रकार अंधश्रद्धा किती गंभीर शोषणाचे माध्यम ठरू शकते, याचे धक्कादायक उदाहरण असल्याचे बोलले जात आहे. आरोपीने धमकी दिल्यामुळे पीडिता सुमारे १५ दिवस भयाच्या छायेत राहिली. अखेर तिने पतीला संपूर्ण घटना सांगून ११ जुलै रोजी हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक करून तपास सुरू केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी संजय शिरोडे (वय ५०) हा तुकडोजी पुतळा परिसरातील एमएसईबी कार्यालयात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. एका चहाच्या दुकानात त्याची पीडित महिला आणि तिच्या पतीशी ओळख झाली होती. संवादादरम्यान आरोपीने आपण माथाडीशी संबंधित असल्याचे सांगत त्यांच्या मुलाला माथाडीमध्ये नोकरी मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे.

नोकरीचे आमिष; आधी जिंकला कुटुंबाचा विश्वास

मुलाला नोकरी मिळेल, या अपेक्षेने कुटुंबाने आरोपीवर विश्वास ठेवला. आरोपीने नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे तयार करण्यास सांगितले. त्यानंतर १९ जून २०२६ रोजी तो पीडितेच्या घरी पोहोचला. कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रती काढण्याच्या बहाण्याने आरोपीने पीडितेच्या पती आणि मुलाला घराबाहेर पाठविले. त्यानंतर मुलाला नोकरी मिळण्यासाठी “विशेष पूजा” करावी लागेल, असे त्याने महिलेला सांगितल्याचा आरोप आहे. मात्र, त्या दिवशी कथित पूजा पूर्ण झाली नसल्याचे सांगून आरोपी पुन्हा येणार असल्याचे सांगत निघून गेला.

विशेष पूजे’च्या नावाखाली अंधश्रद्धेचा सापळा

२५ जून रोजी आरोपीने पुन्हा कथित पूजेची तयारी करण्यास सांगितले. दुसऱ्या दिवशी, २६ जून रोजी तो नारळ, गहू, तांदूळ आणि अन्य पूजन साहित्य घेऊन पीडितेच्या घरी पोहोचला.
मुलाला नोकरी मिळण्यासाठी ही पूजा आवश्यक असल्याचे सांगत आरोपीने कुटुंबाला कथित विधींमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर पिंपळ आणि पळसाची मुळे आणावी लागतील, असे सांगून पीडितेच्या पती आणि मुलाला डुंडा मारोती मंदिर परिसरात पाठविल्याचा आरोप आहे.

पती आणि मुलगा घराबाहेर गेल्यानंतर महिला एकटी असल्याची संधी आरोपीने साधली. मुलाला नोकरी देण्याचे आमिष दाखवत त्याने महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी केल्याचे तक्रारीत नमूद आहे. महिलेने विरोध केला असता, मुलाची नोकरी होणार नाही, असे सांगून तिच्यावर दबाव टाकण्यात आला. त्यानंतर आरोपीने तिच्यावर जबरदस्तीने दुष्कर्म केल्याचा आरोप आहे.

अत्याचारानंतर पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी

घडलेला प्रकार कोणाला सांगितल्यास पती आणि मुलाला ठार मारण्याची धमकी आरोपीने दिल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या धमकीमुळे ती भयभीत झाली आणि सुमारे १५ दिवस कोणालाही काही सांगू शकली नाही. दरम्यान, ५ जुलै रोजी आरोपीने पुन्हा महिलेशी संपर्क साधून कथितरीत्या अनैसर्गिक कृत्याची मागणी केली. त्यानंतर पीडितेने मौन सोडण्याचा निर्णय घेतला. तिने पतीला संपूर्ण घटनाक्रम सांगितला आणि कुटुंबासह पोलिसांकडे धाव घेतली. ११ जुलै रोजी पीडितेने हुडकेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

श्रद्धेचा आधार की शोषणासाठी अंधश्रद्धेचे हत्यार?

मुलाला नोकरी मिळवून देण्यासाठी पूजा, विशिष्ट वस्तू अथवा कथित तांत्रिक विधी आवश्यक असल्याचे सांगणे आणि त्याद्वारे कुटुंबाला प्रभावाखाली आणणे, हा केवळ फसवणुकीचा कथित प्रकार नसून अंधश्रद्धेचा वापर करून असहायतेचा गैरफायदा घेतल्याचा गंभीर आरोप आहे. नोकरी मिळवून देण्याची प्रक्रिया पात्रता, भरतीचे नियम आणि अधिकृत निवड प्रक्रियेतून होते. नारळ, धान्य, झाडांची मुळे अथवा कथित तांत्रिक पूजा करून कोणालाही नोकरी मिळत नाही. मात्र, रोजगाराची गरज आणि कुटुंबाच्या अपेक्षांचा गैरफायदा घेत अंधश्रद्धेचे जाळे विणणारे कथित भोंदू प्रवृत्तीचे लोक नागरिकांना मानसिक दबावाखाली आणण्याचा प्रयत्न करतात.

या प्रकरणात आरोपीने नोकरीच्या आमिषाला कथित पूजेची जोड देत पती आणि मुलाला नियोजनपूर्वक घराबाहेर पाठविले का, पूजेचा संपूर्ण बनाव महिलेला एकटे पाडण्यासाठी रचण्यात आला होता का आणि यापूर्वीही अन्य व्यक्तींना अशाच प्रकारे फसविण्यात आले आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा आहे.

आरोपीविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा

हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी अनामिका मिर्झापुरे यांच्या नेतृत्वात पोलिसांनी आरोपी संजय शिरोडेविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ६४(१), ३५१(२) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व उच्चाटन कायद्यातील कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. आरोपीने कथित पूजेचा बनाव नेमका कसा रचला, नोकरी देण्याच्या नावाखाली कुटुंबाचा विश्वास कसा संपादन केला आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचीही चौकशी होण्याची शक्यता आहे. तक्रारीतील आरोप अद्याप न्यायालयात सिद्ध झालेले नसून प्रकरणाचा अंतिम निष्कर्ष पोलीस तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More