– पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ; पत्नीसमोर थप्पड मारल्याने संतप्त चहाविक्रेत्याचा हल्ला
The Exposer
नागपूर : चहा घेतल्यानंतर अवघे दहा रुपये देण्यास नकार देत शिवीगाळ केल्याने निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले. पत्नीसमोर थप्पड मारल्याने संतप्त झालेल्या चहाविक्रेत्याने ग्राहकावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याची घटना रविवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नारी-नारा परिसरात घडली.
या हल्ल्यात मनोज विश्वनाथ यादव (वय ४५, रा. दर्शननगर, नंदनवन) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कपिलनगर पोलिसांनी चहाविक्रेता कैलास लालचंद गणवीर (वय ४२, रा. न्यू म्हाडा कॉलनी, उप्पलवाडी) याच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मनोज यादव हे एका डेकोरेशन व्यावसायिकाकडे काम करीत होते. रविवारी सकाळी ते उप्पलवाडी परिसरात मंडप उभारण्याच्या कामासाठी गेले होते. दुपारी सुमारे तीन वाजताच्या सुमारास ते कैलासच्या चहाटपरीवर चहा पिण्यासाठी गेले.
चहा घेतल्यानंतर मनोज यांनी चहाचे दहा रुपये दिले नाहीत. त्यामुळे कैलासने त्यांच्याकडे पैसे मागितले. मात्र, मनोज यांनी पैसे देण्यास नकार देत शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. यावरून दोघांमध्ये वाद सुरू झाला.
वाद वाढत असताना मनोज यांनी कैलासच्या पत्नीसमोर त्याला थप्पड मारल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे संतप्त झालेल्या कैलासने धारदार शस्त्राने मनोज यांच्या मानेवर वार केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने मनोज खाली कोसळले.
घटनेनंतर मनोज यांना उपचारासाठी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कपिलनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. ठाणेदार सतीश आडे यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करीत आरोपी कैलास गणवीर याला अटक केली. प्रकरणाचा पुढील तपास कपिलनगर पोलीस करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक











