खाकीतील ‘सच्चा लोकसेवक’ हरपला; ASI अनिल बाभळे यांचे निधन

– पदापेक्षा माणुसकीला दिले महत्त्व; कर्तव्यदक्ष अधिकारी काळाच्या पडद्याआड

The Exposer
नागपूर : बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI/1780) अनिल बाभळे यांचे आज तीव्र हृदयविकाराच्या झटक्याने उमरेड रोडवरील ऑर्बिट हॉस्पिटल येथे उपचारादरम्यान दुःखद निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनाने पोलीस दलासह मित्रपरिवार, सहकारी आणि त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध असलेल्या नागरिकांवर दुःखाचा मोठा आघात झाला आहे.

अनिल बाभळे हे केवळ खाकी वर्दीतील पोलीस अधिकारी नव्हते, तर सर्वसामान्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्यासाठी तत्पर राहणारे ‘सच्चे लोकसेवक’ म्हणून त्यांची ओळख होती. पोलीस दलातील शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारी सांभाळतानाच त्यांनी माणुसकी, आपुलकी आणि सहकार्याची नाळ कधीही तुटू दिली नाही.

अजनी पोलीस ठाण्यात कार्यरत असताना त्यांचा जनसंपर्क अत्यंत दांडगा होता. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत, सर्वसामान्य नागरिकांपासून सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंत त्यांचा मोठा मित्रपरिवार होता. कोणतीही घटना कितीही गंभीर असो किंवा वातावरण कितीही तणावपूर्ण असो, आपल्या प्रभावी जनसंपर्काच्या बळावर नागरिकांशी संवाद साधत परिस्थिती शांततेने नियंत्रणात आणण्याचे कौशल्य त्यांच्याकडे होते.

पोलीस अधिकारी असूनही त्यांनी कधीही पदाचा रुबाब किंवा ‘खाकीचा धाक’ दाखविला नाही. नागरिकांशी मैत्रीपूर्ण संवाद, संयमी स्वभाव आणि मदतीसाठी सदैव पुढे राहण्याची वृत्ती ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची खरी ओळख होती. गरजू व्यक्ती त्यांच्या दारातून रिकाम्या हाताने किंवा निराश होऊन परत जाऊ नये, याची ते नेहमी काळजी घेत असत.

अजनी पोलीस ठाण्यात गुप्तवार्ता विभागाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी उल्लेखनीय कार्य केले. विविध प्रकारची पडताळणी असो किंवा नागरिकांचे पोलीस विभागाशी संबंधित काम असो, ते शक्य तितक्या तत्परतेने पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेत असत. सार्वजनिक, धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम, सभा किंवा संमेलनासह इतर परवानगी प्रक्रियेत त्यांनी नागरिकांना नियमांच्या चौकटीत मार्गदर्शन आणि सहकार्य करण्यावर भर दिला.

त्यांच्या कार्यालयात कामानिमित्त येणाऱ्या प्रत्येकाशी ते आपुलकीने संवाद साधत. लहान-मोठ्या प्रकरणांमध्ये अनेक नागरिक त्यांचे मार्गदर्शन घेत असत. एक काळ असा होता की, अजनी पोलीस ठाण्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्यांपेक्षा अनिल बाभळे यांची भेट घेऊन सल्ला आणि मार्गदर्शन मागणाऱ्यांची संख्या अधिक असल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून आणि परिचितांकडून सांगितले जाते. यातून त्यांनी जनमानसात कमावलेला विश्वास आणि आपुलकी स्पष्ट होत होती.

अजनी पोलीस ठाण्यातील सेवाकाळात त्यांनी आपल्या लोकाभिमुख कार्यपद्धतीने पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात अधिक उंचावली. कायद्याची अंमलबजावणी करताना संवेदनशीलता, नागरिकांशी संवाद साधताना नम्रता आणि कर्तव्य बजावताना प्रामाणिकपणा—या गुणांमुळे ते अनेकांच्या मनात कायमचे स्थान निर्माण करू शकले.

काही वर्षांपूर्वी त्यांची अजनी पोलीस ठाण्यातून बेलतरोडी पोलीस ठाण्यात बदली झाली होती. मात्र, बदलीनंतरही अजनी परिसरातील नागरिक, मित्र आणि परिचितांशी असलेले त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध कायम राहिले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे पोलीस दलाने एक कर्तव्यदक्ष अधिकारी, तर समाजाने माणुसकी जपणारा संवेदनशील लोकसेवक गमावला आहे. त्यांच्या मागे पत्नी व दोन मुले आहेत. मंगळवारी सकाळी 10.30 च्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर मानेवाडा घाट येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहॆ.

दिवंगत ASI अनिल बाभळे यांना भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

– The Exposer

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More