खाकीच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर; पोलीस दलासाठी स्वतंत्र ‘मेडिकल डोसियर’ची गरज!

– बेलतरोडी पोलीस ठाण्यातील ASI अनिल बाभळे यांच्या निधनानंतर पुन्हा चर्चा; पोलीस रुग्णालयाला ‘सुपर स्पेशालिटी’चा दर्जा देण्याची मागणी

The Exposer
नागपूर : नागरिकांच्या सुरक्षेसाठी दिवस-रात्र कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी स्वतंत्र, सक्षम आणि दीर्घकालीन आरोग्य व्यवस्थापन प्रणाली उभारण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. बेलतरोडी पोलीस ठाण्यात कार्यरत सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) अनिल बाभळे यांचे सोमवारी हृदयविकाराने निधन झाल्यानंतर पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याशी संबंधित विविध प्रश्नांवर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.

वाढती लोकसंख्या, शहराचा झपाट्याने होणारा विस्तार, वाढती गुन्हेगारी, सततचा बंदोबस्त, रात्रपाळी आणि कामाच्या अनियमित वेळांमुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवरील शारीरिक आणि मानसिक ताण वाढत आहे. सण-उत्सव, मोर्चे, आंदोलने, निवडणुका, व्हीआयपी बंदोबस्त, वाहतूक व्यवस्थापन आणि आपत्कालीन परिस्थितीत पोलिसांना अनेकदा दीर्घकाळ कर्तव्य बजावावे लागते. परिणामी वेळेवर जेवण, पुरेशी विश्रांती आणि नियमित आरोग्य तपासणीसाठी आवश्यक वेळ मिळत नसल्याचे वास्तव आहे.

या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या ‘सर्व्हिस बुक’च्या धर्तीवर स्वतंत्र, सुरक्षित आणि गोपनीय ‘मेडिकल डोसियर’ तयार करण्याची गरज व्यक्त होत आहे. या मेडिकल डोसियरमध्ये संबंधित अधिकारी किंवा कर्मचाऱ्याच्या आरोग्यविषयक आवश्यक नोंदी, पूर्वीचे आजार, सुरू असलेले औषधोपचार, उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती, वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल आणि पुढील आरोग्य तपासणीची तारीख अद्ययावत स्वरूपात नोंदविण्यात यावी.

मेडिकल डोसियरमुळे प्रत्येक अधिकारी-कर्मचाऱ्याच्या आरोग्याचा नियमित पाठपुरावा करणे, आवश्यक वैद्यकीय तपासण्यांची पूर्वसूचना देणे आणि आजारांचे वेळेत निदान करणे शक्य होऊ शकते. आरोग्य सुदृढ असल्यास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अधिक कार्यक्षमतेने कर्तव्य बजावू शकतात. त्यामुळे पोलीस दलाच्या आरोग्य व्यवस्थापनाकडे केवळ वैद्यकीय सुविधा म्हणून नव्हे, तर शहराच्या सुरक्षा व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग म्हणून पाहण्याची आवश्यकता आहे.

शहरातील प्रत्येक पोलीस ठाणे, पोलीस क्वार्टर आणि पोलीस वसाहतीमध्ये पोलीस रुग्णालयाच्या माध्यमातून दरमहा आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात यावे. या शिबिरांचे महिनानिहाय वेळापत्रक आगाऊ जाहीर करून त्यामध्ये हृदयरोग, मधुमेह, रक्तदाब, अस्थिरोग, नेत्ररोग, दंतरोग आणि अन्य आजारांशी संबंधित तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करण्यात यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

पोलीस मुख्यालय परिसरातील पोलीस रुग्णालयाचा दर्जा उंचावून त्याचा सर्वांगीण विकास करण्याची गरजही अधोरेखित होत आहे. आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री, तज्ज्ञ डॉक्टर, अत्यावश्यक तपासण्या आणि उपचार सुविधा उपलब्ध करून या रुग्णालयाचे ‘सुपर स्पेशालिटी पोलीस रुग्णालया’त रूपांतर करण्यासाठी राज्य शासन आणि पोलीस प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी पुढे येत आहे.

केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना उपलब्ध असलेल्या आरोग्य सुविधांच्या धर्तीवर राज्य पोलीस दलातील सेवानिवृत्त अधिकारी-कर्मचारी आणि त्यांच्या पात्र कुटुंबीयांसाठीही व्यापक व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत राज्य शासनाने सकारात्मक धोरण आखावे. सेवेत असताना नागरिकांच्या सुरक्षेसाठी आयुष्याचा मोठा काळ देणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीनंतरही आवश्यक वैद्यकीय संरक्षण मिळणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे.

दरम्यान, पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी केवळ वार्षिक आरोग्य तपासणी पुरेशी ठरणार नसून नियमित तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, उपचारांचा पाठपुरावा आणि आरोग्यविषयक नोंदींचे सुरक्षित व्यवस्थापन आवश्यक आहे. यासाठी स्वतंत्र ‘पोलीस आरोग्य व्यवस्थापन कक्ष’ स्थापन करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. ASI अनिल बाभळे यांच्या निधनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

-The Exposer

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More