– डॉ. आंबेडकर महाविद्यालयात प्राचार्यांच्या कक्षाला कुलूप; ‘आदेश दाखवा’ म्हणत प्रवेश रोखल्याचा आरोप
The Exposer
नागपूर : डॉ. आंबेडकर महाविद्यालय, दीक्षाभूमी येथे नवनियुक्त महिला प्राचार्यांना त्यांच्या कार्यालयीन कक्षात प्रवेश करण्यापासून रोखल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्राचार्यांच्या कक्षाला कुलूप लावून शासकीय तथा प्रशासकीय कर्तव्य बजावण्यात अडथळा निर्माण केल्याच्या आरोपावरून बजाजनगर पोलिसांनी सुरक्षा रक्षक सुपरवायझर सिद्धार्थ म्हेसकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणी डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. भुवनेश्वरी अशोक मेहरे (वय ५९) यांनी बजाजनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, त्या १९८९ पासून महाविद्यालयात कार्यरत असून, संस्थेने त्यांची पाच वर्षांसाठी प्राचार्यपदी नियुक्ती केली आहे. यापूर्वी त्या जीव रसायनशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत होत्या.
तक्रारीत नमूद माहितीनुसार, डॉ. मेहरे यांनी ६ जुलै २०२६ रोजी प्राचार्यपदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर महाविद्यालयाच्या कार्यकारिणी समितीच्या ठरावानुसार त्या प्राचार्यांच्या कक्षात कामकाज करीत होत्या. मात्र, १० जुलै रोजी सकाळी त्या नियमितपणे महाविद्यालयात पोहोचल्या असता त्यांच्या कार्यालयीन कक्षाला कुलूप लावण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

याबाबत त्यांनी सुरक्षा रक्षक सुपरवायझर सिद्धार्थ म्हेसकर याच्याकडे विचारणा केली असता, त्याने कथितरीत्या वरिष्ठांच्या आदेशाचा दाखला देत प्राचार्यांच्या कक्षात प्रवेश करण्यासाठी आदेश दाखविण्याची मागणी केली. डॉ. मेहरे यांनी आपण महाविद्यालयाच्या प्राचार्य असून आपल्या नियुक्तीचे आदेश उपलब्ध असल्याचे सांगितले. मात्र, तरीही कक्ष उघडण्यात आला नाही आणि त्यांना प्रवेशापासून रोखण्यात आल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
घटनेच्या वेळी कार्यालयीन परिसरात उपस्थित असलेल्या कर्मचाऱ्यांसमोरच महिला प्राचार्यांना त्यांच्या कक्षात जाण्यापासून रोखण्यात आल्याने महाविद्यालयाच्या प्रशासकीय व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. अधिकृतरीत्या पदभार स्वीकारलेल्या प्राचार्यांच्या कक्षाला कुलूप कोणी आणि कोणाच्या आदेशावरून लावले? सुरक्षा रक्षक सुपरवायझरला प्राचार्यांचे नियुक्ती आदेश तपासण्याचा अधिकार कोणी दिला? तसेच महिला प्राचार्यांच्या प्रशासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यामागे नेमका उद्देश काय होता, असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
डॉ. मेहरे यांच्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी सिद्धार्थ हेंस्कर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता, २०२३ मधील कलम १२६, १२६(१) आणि १२६(२) अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. प्रकरणाचा पुढील तपास बजाजनगर पोलीस करीत आहेत.
प्राचार्यांच्या खुर्चीभोवती ‘कुलूपबंद’ संघर्ष?
महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाशी संबंधित प्रशासकीय घडामोडी सुरू असतानाच नवनियुक्त महिला प्राचार्यांना त्यांच्या कक्षात प्रवेश नाकारल्याचा आरोप झाल्याने प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. प्राचार्यांच्या कक्षाला कुलूप लावण्याचा आदेश नेमका कोणी दिला आणि या कथित प्रकारामागे आणखी कोणाची भूमिका आहे का, याचा निष्पक्ष तपास करण्यासाठी आरोपी म्हेसकर याचा मोबाईल सिडिआर काढावा, त्यानुसार इतरांनाही गुन्ह्यात आरोपी करावे, शासकीय कामात अडथळा निर्माण करून गैरवर्तन करीत कर्तव्यापासून रोखल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यात कडक कलमे लावण्यात यावी, अशी मागणी फिर्यादी प्राचार्य डॉ. मेहरे यांनी केली आहॆ.
Author: संतोष तायडे
संपादक











