रामनगरात बारच्या नावाखाली ‘तमाशा’, थाटला होता हुक्का पार्लर?

– अंबाझरी पोलिसांचा मध्यरात्री छापा, बार मालकासह व्यवस्थापकावर गुन्हा

The Exposer
नागपूर : अंबाझरी पोलिसांनी मध्यरात्री कारवाई करत रामनगर मेन रोडवरील रिदम अँड वाइन बार अँड रेस्टॉरंट (तमाशा) येथे सुरू असलेल्या कथित बेकायदा हुक्का पार्लरवर छापा टाकला. या प्रकरणी बारचा मालक आणि व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार २७ जुलै २०२६ रोजी रात्री सुमारे १.२० ते २.०० वाजण्याच्या दरम्यान छापेमारी करण्यात आली. यावेळी ग्राहकांना विविध फ्लेवरचे हुक्के पुरविले जात असल्याचे पोलिसांच्या कारवाईत निदर्शनास आले.

कारवाईदरम्यान पोलिसांनी ४ हुक्का पॉट, ४ पाइप, ४ फ्लेवरयुक्त हुक्का कंटेनर तसेच एक सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ₹८,००० किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी बारचा मालक हेमंत राजकुमार गुरबक्षाणी (वय ३३) आणि व्यवस्थापक बृजेश बृज प्रसाद पाल (वय ३६) यांच्याविरुद्ध अंबाझरी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ३२४/२०२६ नोंदविण्यात आला आहे.

आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १२७(२), २७४ तसेच सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने (जाहिरात प्रतिबंध व व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरणाचे विनियमन) अधिनियम, २००३ मधील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, अंबाझरी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

दरम्यान, बारमध्ये कथितरित्या हुक्का पार्लर सुरू असल्याची कारवाई झाल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या देखरेख आणि अंमलबजावणीबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More