– वर्धा रोडला तलावाचे स्वरूप, सोनेगाव परिसराला पाण्याचा वेढा
– पोलीस ठाणे, वाहतूक कार्यालय, अंडरब्रिज व रस्ते जलमय
The Exposer
नागपूर : नागपुरात झालेल्या मुसळधार पावसाने मंगळवारी शहराच्या दक्षिण भागाला अक्षरशः झोडपून काढले. विमानतळ परिसरातून आलेल्या पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे सोनेगाव पोलीस ठाण्यात पाणी शिरले, तर शेजारील सोनेगाव वाहतूक शाखेच्या कार्यालयात तब्बल चार फूट पाणी साचल्याने प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.
अचानक वाढलेल्या पाण्यामुळे पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजावर परिणाम झाला. कर्तव्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना पाण्यातूनच काम करावे लागले. कार्यालयातील साहित्य सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी धावपळ करावी लागली.
दरम्यान, पोलीस ठाणे आणि वाहतूक कार्यालय परिसरात उभ्या असलेल्या अनेक दुचाकी वाहनांमध्ये पाणी शिरल्याने ती नादुरुस्त झाली. तर मुसळधार पावसामुळे सोमलवाडा परिसर पूर्णपणे जलमय झाला. परिसरात सुरू असलेल्या रस्ते विकासाच्या कामांमुळे पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक भागांना तलावाचे स्वरूप आले. नागरिकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

शहरातील अनेक अंडरब्रिज, प्रमुख रस्ते आणि निवासी वस्त्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत झाली. अनेक नाले ओव्हरफ्लो झाल्याने पाणी थेट रस्त्यावर आले आणि काही ठिकाणी वाहतुकीला तात्पुरता अडथळा निर्माण झाला.
पावसाचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांनाही बसला. अनेक शाळांच्या व्हॅन आणि बस पाण्यात अडकल्या, त्यामुळे विद्यार्थी व पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. शहरातील परिस्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने उद्याला शाळांना सुटी जाहीर केली
दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही जोरदार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पाणी साचलेल्या रस्ते व अंडरब्रिज टाळावेत, असे आवाहन करण्यात येत आहे.

Author: संतोष तायडे
संपादक











