– शहरात झोपडपट्ट्यांतील १०० युवक पोलिसांचे ‘डोळे-कान’ बनणार
– नागरिकांच्या सहभागातून अमली पदार्थांविरोधी मोहिमेची संकल्पना
The Exposer
नागपूर : नागपूर शहरातील झोपडपट्ट्या आणि वंचित वस्त्यांमध्ये वाढत्या अमली पदार्थांच्या अनधिकृत विक्रीला आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्तांनी ‘SLUM 100’ या महत्त्वाकांक्षी संकल्पनेला प्राधान्य दिले आहे. बहुजन समाज पार्टी (बसपा) नागपूर शहरच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन ‘नशामुक्त नागपूर’साठी निवेदन सादर केले. यावेळी पोलीस आयुक्तांनी प्रत्येक झोपडपट्टीत स्थानिक १०० युवकांचा विशेष गट तयार करून पोलिसांच्या समन्वयाने ड्रग्जविरोधी मोहीम राबविण्याची संकल्पना मांडली.
या योजनेअंतर्गत स्थानिक युवक आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून अमली पदार्थांची विक्री, व्यसनाधीनता आणि गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. पोलीस प्रशासनाच्या थेट मार्गदर्शनाखाली ‘SLUM 100’ प्रकल्प राबवून ‘नशामुक्त नागपूर’ अभियानाला गती देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला.
बसपाच्या शिष्टमंडळाच्या प्रमुख मागण्या
ड्रग्जविरोधात कठोर कारवाईची मागणी

बहुजन समाज पार्टी (बसपा) नागपूर शहरच्या शिष्टमंडळाने आज पोलीस आयुक्तांची भेट घेऊन शहरातील झोपडपट्टी व वंचित भागांमध्ये वाढत असलेल्या गांजा, ड्रग्ज व इतर अमली पदार्थांच्या अनधिकृत विक्रीबाबत सविस्तर निवेदन सादर केले. यावेळी शहरात ‘नशामुक्त नागपूर’ अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी विविध उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
शिष्टमंडळाने झोपडपट्टी भागांतील अमली पदार्थांची विक्री तातडीने बंद करून तस्करी करणाऱ्यांविरोधात विशेष मोहीम राबविण्याची मागणी केली. तसेच व्यसनाधीन युवकांच्या समुपदेशन व पुनर्वसनासाठी विशेष उपक्रम सुरू करावेत, प्रत्येक झोपडपट्टीत पोलिसांच्या समन्वयाने स्थानिक नागरिकांचा सहभाग वाढवावा आणि पोलीस आयुक्तांनी मांडलेल्या ‘SLUM 100’ प्रकल्पाची प्रभावी अंमलबजावणी करून संपूर्ण शहरात ‘नशामुक्त नागपूर’ अभियान राबवावे, अशी भूमिका बसपाने मांडली.
या बैठकीला बसपा नागपूर शहराध्यक्ष अनिकेत कत्तरमारे, शहर उपाध्यक्ष महेश माने, महासचिव मंगेश नागदेवे, शहर सचिव अमित बनसोड, शहर सचिव राकेश सहारे, प्रबोधनकार अजयकुमार, धिरज डोंगरे, सुरज जांमगडे, रौनक जांभूळकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: संतोष तायडे
संपादक











