– वृक्षारोपण व धम्ममय उपक्रम उत्साहात, भिक्खू संघाला भोजनदान
The Exposer
नागपूर : आषाढ पौर्णिमा, गुरुपौर्णिमा आणि वर्षावास प्रारंभाच्या निमित्ताने भीमनगर-ईसासनी परिसरातील निसर्गरम्य बोधिमग्गो महाविहारात धार्मिक व पर्यावरणपूरक उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. धम्म, सेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम साधणाऱ्या या कार्यक्रमात मोठ्या संख्येने उपासक-उपासिका सहभागी झाले.
पर्यावरणपूरक वातावरणासाठी ओळखल्या जाणाऱ्या बोधिमग्गो महाविहार परिसरात बोधिमग्गो सेवा संस्थेने खडकाळ जमिनीवर हजारो वृक्षांची यशस्वी लागवड केली आहे. त्याच उपक्रमाचा पुढचा टप्पा म्हणून वर्षावास प्रारंभानिमित्त परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
सकाळी उपोषथ दिनानिमित्त दिवसभर अधिष्ठान करणाऱ्या उपासक-उपासिकांना संस्थेचे सचिव डॉ. भदंत सीलवंस महास्थवीर यांनी उपोषथ अष्टशील प्रदान केले. त्यानंतर आदरणीय भिक्खू संघाला भोजनदान करण्यात आले. उपासकांनी घरून आणलेल्या भोजनाचा सामूहिक आस्वाद घेत धम्मबंध अधिक दृढ केला.
यानंतर भदंत नाग दीपंकर महास्थवीर यांनी परित्त सज्झायन, धम्मचक्कप्पवत्तन सुत्ताचे पठण आणि प्रेरणादायी धम्मदेसना दिली. वर्षावासाच्या प्रारंभानिमित्त महाविहाराची आकर्षक सजावट भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात ईसासनी-वागधरा ग्रामपंचायतीचे सरपंच अरविंद ढोणे आणि बोधिमग्गो सेवा संस्थेचे अध्यक्ष शंकरराव निकोसे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्यांसह भिक्खू सुजाततिस्स, सामणेर विपस्सी, अशोक जांभुळकर, अनिल मेश्राम, एन. टी. मेश्राम, विनायकराव रामटेके, खिमेश बागडे, सत्यशील नंदेश्वर आदी मान्यवर उपस्थित होते.
या उपक्रमाचे आयोजन बोधिमग्गो सेवा संस्था, बोधिमग्गो महाविहार दायक-दायिका सभा, बोधिमग्गो उपासक-उपासिका संघ, बोधिमग्गो धम्म संडे स्कूल, बोधिमग्गो कम्युनिटी किचन, बोधिमग्गो विपस्सना सेंटर, बोधिमग्गो ग्रंथालय तसेच बोधिमग्गो पर्यावरण संरक्षण व संवर्धन केंद्र (भदंत बोधिविनीत स्मृती परिसर) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले. धम्म, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संगम घडविणारा हा उपक्रम उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी श्रामणेरी धम्मसीला, प्रज्ञा मेश्राम, आचल वासनिक, अनिषा काटकर, वैश्नवी बागर, तेजस तायडे, खिमेश बागडे आदींनी विशेष परिश्रम घेतले.
Author: संतोष तायडे
संपादक











