वाठोड्यात गुन्हे शाखेचा जुगार अड्ड्यावर धडाकेबाज छापा; 9 जुगारी जेरबंद

– 22.37 लाखांचा मुद्देमाल जप्त, जुगार अड्डयाला कुणाचा आशीर्वाद?

The Exposer
नागपूर : नागपूर शहर गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत नऊ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले. या कारवाईत रोख रक्कम, चारचाकी, दुचाकी, मोबाईल फोन आणि ताशपत्ते असा एकूण 22 लाख 37 हजार 45 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई बघता हा जुगार अड्डा कुणाच्या आशीर्वादाने सुरु होता आणि तो ‘कलेक्टर’ कोण? अशी उलट सुलट चर्चा रंगली आहॆ.

मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार गुन्हे शाखेच्या युनिट-5 ने संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी आरोपी स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी पैशांची हारजित लावून ताशपत्त्यांद्वारे जुगार खेळताना प्रत्यक्ष आढळून आले. पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत कारवाई करून आरोपींकडून 32 हजार 45 रुपये रोख, एक होंडा सिटी कार, एक महिंद्रा बोलेरो, पाच दुचाकी वाहने, विविध कंपन्यांचे नऊ अँड्रॉइड मोबाईल आणि ताशपत्ते असा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी निलेश राजेंद्र चव्हाण, अंकुश सुरेश खडकी, प्रभाकर लक्ष्मण भगत, अमित किशोर खोब्रागडे, शुभम बिसनलाल मस्करे, स्वप्निल दादू बिसेन, विजय केशवराव पाटील, भगवान पतुजी धोटे आणि स्वप्निल राजेंद्र मेश्राम या नऊ आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील कायदेशीर कारवाईसाठी आरोपींसह जप्त मुद्देमाल वाठोडा पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला असून, या धडक कारवाईमुळे परिसरातील बेकायदेशीर जुगार अड्डे चालविणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More