चारपट परताव्याच्या आमिषाने कोट्यवधींची फसवणूक; ‘ठग गँग’वर मकोकाचा फास!

– बनावट नोटांच्या गड्ड्या दाखवून नागरिकांना लुटणाऱ्या टोळीवर पोलिसांची मोठी कारवाई
– खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, फसवणूक, अवैध शस्त्रांसह गंभीर गुन्ह्यांची मालिका

The Exposer
नागपूर : चारपट पैसे परत मिळवून देण्याचे आमिष दाखवत नागरिकांना जाळ्यात ओढणाऱ्या आणि कागदी नोटांच्या बनावट गड्ड्या दाखवून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या संघटित गुन्हेगार टोळीवर अखेर नागपूर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. नंदनवन पोलीस ठाण्यात दाखल फसवणुकीच्या गुन्ह्यात सात आरोपींना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्याप फरार आहेत.

पोलिस तपासात या टोळीतील सदस्यांविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारहाण, फसवणूक, अवैध शस्त्र बाळगणे तसेच बनावट कागदपत्रे तयार करणे अशा गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे उघड झाले आहे.

चारपट परताव्याचे आमिष, ५० हजारांची फसवणूक

१७ जून २०२६ रोजी फिर्यादी निखिल आकाश चव्हाण यांना आरोपींनी ५० हजार रुपये घेतल्यास त्याच्या चारपट रक्कम परत देण्याचे आमिष दाखवले. पैसे स्वीकारल्यानंतर कागदी नोटांच्या गड्ड्या दाखवून त्यांची दिशाभूल करण्यात आली आणि रक्कम हडप करण्यात आली. नंदनवन पोलिसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली. तपासादरम्यान मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर करून फिर्यादीशी संपर्क साधल्याचेही निष्पन्न झाले.

टोळीच्या म्होरक्यासह सात जणांवर मकोका

या प्रकरणात परवेज अहमद मोहम्मद शरीफ पटेल याला टोळीचा प्रमुख मानण्यात आले आहे. त्याच्यासह अवतार सिंह जग्गू सिंह जुनी, शाहरुख खान उर्फ खान, अंकित लीलाधर वासनिक, अंकित राजेंद्र सूर्यवंशी, मोहम्मद मन्नान मोहम्मद इद्रीस शेख आणि अदनान उर्फ आशू रोशन खान यांना अटक करण्यात आली असून सर्व आरोपी सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात आहेत. तर नरेश बुचके आणि पुणेवाला पाटील हे फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींविरुद्ध यापूर्वीही अनेक गंभीर गुन्हे नोंद असून प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही त्यांची गुन्हेगारी सुरूच होती. त्यामुळे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मकोका प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यास ७ ऑगस्ट २०२६ रोजी मंजुरी मिळाल्यानंतर भारतीय महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यातील कलम ३(१)(ii), ३(२) व ३(४) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त रोशन पंडित करीत आहेत.

संतोष तायडे
Author: संतोष तायडे

संपादक

Leave a Comment

Read More