– सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा पर्दाफाश; सोन्याच्या दागिन्यांसह ४.६९ लाखांचा मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : नवीन कामठी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अनाज विक्रेत्याच्या घराचे कुलूप तोडून दागिने व रोख रक्कम लंपास करणाऱ्या चोराचा पोलिसांनी अवघ्या १२ तासांत छडा लावत मुसक्या आवळल्या. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्याकडून सोन्याच्या दागिन्यांसह तब्बल ४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव रोहित नरेश गेडाम (४३), रा. भीमनगर, कामठी असे आहे. याप्रकरणी सुरेंद्र लोणारे (५६), रा. जयभीम चौक, कामठी यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली होती.
प्राप्त माहितीनुसार, शुक्रवारी सुरेंद्र लोणारे हे कुटुंबासह साप्ताहिक बाजारात दुकान लावण्यासाठी सकाळी घराला कुलूप लावून बाहेर पडले. रात्री सुमारे ८.३० वाजता ते घरी परतले. रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास घराच्या कुलुपाकडे पाहिल्यानंतर त्यांना संशय आला.
घरात प्रवेश करून तपासणी केली असता अलमारीचे लॉकर उघडे असल्याचे आणि त्यातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. चोरी झाल्याचे स्पष्ट होताच त्यांनी सकाळी नवीन कामठी पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.
सीसीटीव्हीने उघड केला चोराचा चेहरा
तक्रार दाखल होताच नवीन कामठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले. त्याचवेळी पोलिसांनी आपले गुप्त माहितीचे जाळे सक्रिय केले. सीसीटीव्ही फुटेज आणि मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना रोहित गेडाम याच्यावर संशय आला. त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी आरोपीकडून सोन्याच्या दागिन्यांसह एकूण ४ लाख ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. अवघ्या १२ तासांत चोरीचा छडा लावल्याने नवीन कामठी पोलिसांच्या तपासाचे कौतुक होत आहे. प्रकरणाचा पुढील तपास नवीन कामठी पोलिस करीत आहेत.
Author: संतोष तायडे
संपादक










