– सायबर पोलिसांचा दणका, ९० कोटी २५ लाखांचा व्यवहार
– ६ आरोपी गजाआड, २३६ एटीएम कार्डांसह मुद्देमाल जप्त
The Exposer
नागपूर : सायबर गुन्हेगारांना बँकिंग यंत्रणेचा आधार देत नागरिकांच्या कष्टाच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्या टोळीच्या मुळावर नागपूर शहर पोलिसांच्या सायबर पोलिसांनी घाव घातला आहे. बनावट बँक खाती उघडून तब्बल ९० कोटी २५ लाख रुपयांची संशयास्पद रक्कम जमा करणाऱ्या नेटवर्कचा पर्दाफाश करीत सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या कारवाईमुळे सायबर फसवणुकीच्या तपासाला मोठी दिशा मिळाली असून, आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या कागदपत्रे व बँकिंग साहित्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे. सायबर पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सायबर फसवणुकीसाठी विविध बँकांमध्ये खाती उघडून त्यांचा वापर केल्याचा पोलिसांचा आरोप आहे. या खात्यांमध्ये ९० कोटी २५ लाख रुपयांची रक्कम जमा झाल्याचे तपासात समोर आले आहे. या खात्यांवर महाराष्ट्रासह विविध राज्यांतून एकूण १०४ तक्रारी दाखल असल्याचेही पोलिसांनी नमूद केले आहे. त्यामुळे हे नेटवर्क केवळ नागपूरपुरते मर्यादित नसून त्याची व्याप्ती आंतरराज्यीय असल्याचे स्पष्ट होत आहे.
२३६ एटीएम कार्डांपासून १८० कोऱ्या धनादेशांपर्यंत
पोलिसांनी आरोपींकडून मोठ्या प्रमाणात बँकिंग साहित्य जप्त केले आहे. त्यामध्ये २३६ विविध बँकांचे एटीएम कार्ड, ८२ पासबुक, ८५ चेकबुक, १८० कोरे धनादेश, ४५ विविध मोबाइल कंपन्यांचे सिमकार्ड, १३ रबर स्टॅम्प, ४ निवडणूक ओळखपत्रे, १४ आधारकार्ड, ५ पॅनकार्ड, ३ आरसी कार्ड, २ ओळखपत्रे, १ स्वाइप मशीन, ५ डायऱ्या, ७ बँक स्कॅनर, बँक खाती उघडण्यासाठी वापरलेली केवायसी कागदपत्रे, विविध बँक खात्यांची पासबुक, चेकबुक व त्यासंबंधी फाडलेली कागदपत्रे, असा मोठा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
एवढ्या मोठ्या प्रमाणातील एटीएम कार्ड, चेकबुक, सिमकार्ड आणि केवायसी कागदपत्रांचा साठा आढळल्याने आरोपींचे बँक खाते उपलब्ध करून देण्याचे मोठे नेटवर्क असल्याचा संशय अधिक बळावला आहे.
सहा आरोपी अटकेत
या प्रकरणात पोलिसांनी उज्ज्वला ताराचंद राजगिरे (३२) रा. धानला, ता. मौदा, नागपूर, इरफान वल्द इक्बाल शेख (३२) रा. बेकरी दुकान, सौदागर मोहल्ला, अन्सारी वार्ड, मुस्लिम लायब्ररी जवळ, भंडारा, मुणाली दिगंबर कांबळे (२६), रा. कांबळे वीला, सालाई गोधणी, नागपूर, निधिता अमित रामटेक (२२) रा. ह. मू. शशिकांत भिसे, प्लॉट नंबर 144, गजानननगर, हुडकेश्वर पिपला रोड, नागपूर, आयुष चंद्रकांत रामटेक (२०) रा.बालाजी नगर, वेणू कॉर्नरजवळ, मानेवाडा रोड, नागपूर, आणि आदित्य राहुल दुपारे (२०) रा प्लॉट नंबर 13 जी, न्यू कैलासनगर, मानेवाडा रोड, नागपूर यांना अटक केली आहे. आरोपींना १० ऑगस्ट २०२६ रोजी पोलीस कोठडी रिमांड देण्यात आला होता. अन्य साथीदारांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.
आंतरराष्ट्रीय टोळीशी संबंधांचा संशय
या गुन्ह्याच्या तपासात आंतरराष्ट्रीय टोळीचा सक्रिय सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे आरोपींचे इतर साथीदार, त्यांनी उपलब्ध करून दिलेली बँक खाती, या खात्यांतून झालेल्या आर्थिक व्यवहारांची साखळी आणि सायबर फसवणुकीतील इतर लाभार्थी यांचा शोध आता घेतला जात आहे.
सायबर पोलिसांच्या तपासकौशल्याला सलाम!
सायबर फसवणुकीत पैशांचा माग काढणे, बनावट खात्यांचे जाळे उलगडणे आणि विविध राज्यांतील तक्रारींची सांगड घालणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान असते. मात्र नागपूर सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास, आर्थिक व्यवहारांचा माग आणि उपलब्ध पुराव्यांची बारकाईने छाननी करून या नेटवर्कपर्यंत मजल मारली. त्यामुळे या कारवाईचे विशेष कौतुक होत आहे.
पोलीस आयुक्त डॉ. विश्वास नांगरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त राजेंद्र दाभाडे, पोलीस उपायुक्त (सायबर) दीपक अग्रवाल आणि सहायक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर बोरकुटे व सुरेश डांबर यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात पोलिस उपनिरीक्षक दर्शन थोरात, संतोष ओवांडकर, सफौ दत्ता निनावे, पोहवा गजानन मोरे, जितेंद्र पदाडे, स्वप्नील बडे, सुरज भारती, पोअं. विजय तेलमोरे, आकाश मकेश्वर, पवन कावळे, आशिष खोपे, भारत टेकाम, महिला अंमलदार निशीका बांते, निधी भुरले, आकांक्षा सिंग तसेच वाहनचालक सफौ संजय मुडे यांचा सहभाग आहे.
संपूर्ण साखळी उघडकीस आणण्याचे आव्हान
सायबर गुन्हेगारांच्या आर्थिक नाड्या आवळण्यासाठी नागपूर सायबर पोलिसांनी केलेली ही कारवाई निश्चितच कौतुकास्पद असून, ९० कोटींच्या आर्थिक व्यवहारामागील संपूर्ण साखळी उघडकीस आणण्याचे मोठे आव्हान आता तपास पथकासमोर आहे.

Author: संतोष तायडे
संपादक










